Mangala Gauri 2023 : श्रावण महिन्यात मंगळागौरीला (Mangala Gauri) विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. आज श्रावणातील पहिला मंगळवार. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळागौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होते. मंगळागौरीला पूजा कशी करावी? या दरम्यान खेळले जाणारे खेळ कोणते? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. 


मंगळागौरी पूजेसाठी लागणारं साहित्य :


मंगळागौरी पूजेसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती, नित्य पूजेचं साहित्य, बुक्का, अक्षता, 5 खारका, 5 सुपार्‍या, 5 बदाम, 4 खोबर्‍याच्या वाटया, सोळा प्रकारची पत्री, दोन वस्त्र, आठ वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, सोळा काडवाती, तुळशीची पाने, केळी, पंचामृत, नैवेद्यासाठी दूध, जानवे, सोळा विडयाची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, केवड्याचे कणीस, एक नारळ, कापड, हळद-कुंकू इतर साहित्याची गरज असते.


नवविवाहित स्त्रियांसाठी खास सण 


नवविवाहित स्त्रिया या दिवशी सकाळी स्नान करून, सोवळे नेसून पूजेला बसतात. मंगळागौर म्हणजे लग्नात अन्नपूर्णाची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची पूजा करतात. त्यानंतर पुरणाच्या दिव्यांनी आरती करुन सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कथा वाचतात. नंतर पूजेसाठी आलेल्या सुवासिनींचे भोजन होते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. या सुवासिनींना काही वस्तूंचे वाणदेखील दिलं जातं.
 
नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करत 'गौरी गौरी सौभाग्य दे' अशी प्रार्थना करतात. सामूहिकरीत्या ही पूजा केली जाते. ज्या घरी मंगळागौरीची पूजा करतात तेथे संध्याकाळी महिलांना हळदी कुंकूसाठी बोलावतात. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी आणि हातावर साखर देतात. सुवासिनींची गव्हाने ओटी भरतात. रात्री फराळाचे जिन्नस करतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात.


मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ


मंगळागौरीच्या वेळी अनेक खेळ खेळले जातात. जसे की, वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा - इत्यादी प्रकारचे खेळ यात खेळले जातात. 


मंगळागौरीचे खेळ खेळताना अनेक गाणीही गायली जातात. तसेच, या विविध खेळांमुळे अनेक महिला तर एकत्र येतातच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांमुळे महिलांचा शारीरिक व्यायामही होतो. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Important Days in August 2023 : 'स्वातंत्र्य दिन', 'रक्षाबंधन'सह विविध सणांची मांदियाळी, ऑगस्ट महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी