Shrawan Somwar 2023: आज पवित्र श्रावण मासाचा प्रथम श्रावण सोमवार असून, यानिमित्त परळीच्या वैद्यनाथ मंदिरात (Parli Vaidyanath) भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन मनोभावे पूजन केले. यावर्षी विशेष करून बीड (Beed) जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पाऊस अत्यंत कमी असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशावेळी श्रावण महिन्यात धो धो पाऊस पाडून शेतकरी बळीराजावर आलेली संकटे दूर करा, अशी प्रार्थना पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथांच्या चरणी केली असल्याचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. आज श्रावण सोमवार निमित्ताने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सकाळी वैद्यनाथांचे दर्शन घेतले, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 


नाथ प्रतिष्ठाणतर्फे सजावट आणि रोषणाई


प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षीही धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण मंदिरात सुमारे 21 प्रकारच्या फुलांनी अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने मंदिरावर मनमोहक एलईडी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला 24 तास ओम नम: शिवाय चा जाप करणारी ध्वनी क्षेपक बसवण्यात आल्याची माहिती नाथ प्रतिष्ठाणचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांनी दिली आहे. या संपूर्ण सुशोभीकरणामुळे मंदिर आणि परिसरात अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळत आहे. 


आज श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी असा योग आला आहे. या निमित्ताने राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ मंदिरात देखील भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात विधीवत पूजा करुन भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्याने, सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, बारा ज्योतिर्लिंगांपैकी हिंगोलीतील औंढा नागनाथ, छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिर आणि पुण्यातील भीमाशंकर मंदिर देखील सोमवार निमित्तानं सजून गेलंय. शिवशंभोंच्या दर्शनासाठी भाविकांचा अलोट उत्साह आणि गर्दी दिसून येत आहे.  


वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 


श्रावणी सोमवारच्या निमित्ताने बीडमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं मंदिर आकर्षक रोषणाईनं उजळून निघालंय. वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने भाविकांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळे दर्शनासाठी राज्यासह परराज्यातूनही भाविक येत असतात. त्यांना दर्शन घेणं सुलभ व्हावं यासाठी मंदिराच्या उत्तरेकडील पायऱ्यांवर लोखंडी बॅरिकेटस उभारण्यात आलेत. दर्शनासाठी राज्यच नाही तर देशातील विविध ठिकाणचे भाविक मंदिर परिसरात आले आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने देखील व्यवस्था केलीये. तर सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची करडी नजर इथे आहे. श्रावण महिन्यात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात बघायला मिळते. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


First Shravan Somvar 2023 Live Updates : आज पहिला श्रावणी सोमवार; राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची रीघ