Lakshmi Pujan 2023 : दिवाळी (Diwali 2023) लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) ही भारतीय संस्कृतीतील महत्वाची पूजा मानली जाते. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा दरवर्षी प्रथेप्रमाणे केली जाते. यावर्षी लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबर म्हणजेच आज केलं जाणार आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष चोपडी पूजन देखील करतात. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. याच संदर्भात अधिक माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.


लक्ष्मीपूजनाची विधी :


पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितल्याप्रमाणे, लक्ष्मीपूजन हे आज 12 नोव्हेंबरलाच नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी हे आपली चोपडी पूजन करुन आपल्या व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. त्यासाठी ते नव्या वहीची (चोपडी) विधीवत पूजा करतात. यावेळी घरोघरी लक्ष्मीचं देखील पूजन केलं जातं. घरातील पैसे, सोने-नाणे हे देवीच्या फोटोसमोर मांडून त्याची पूजा केली जाते. या लक्ष्मीने आपल्या घरी स्थिर राहावं, आपल्याला सुख द्यावं, ऐश्वर्य द्यावं यासाठी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन केले जाते. या दिवशी अंगाला उटणे लावून आंघोळ करतात. या दिवशी लक्ष्मीची यथासांग पूजा करून, घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्तास्यांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते.


लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त


रविवारी 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी ते रात्री वाजून 36 मिनिटांपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करू शकता.


लक्ष्मीपूजनाची परंपरा :


अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. केरसुणीने घर स्वच्छ होऊन घरातील दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.


महत्त्वाच्या बातम्या : 


Narak Chaturdashi 2023: नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानाचं महत्त्व काय? जाणून घ्या मुहूर्त आणि फायदे