Janmashtami Recipe 2023 : हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी (Janmashtami 2023) हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भाविक उपवास करतात आणि भगवान श्रीकृष्णाची (Shri Krishna) पूजा करतात. यंदा 6 सप्टेंबरला जन्माष्टमी साजरी होणार आहे. या दिवशी लोक घरी विविध प्रकारचे खास पदार्थ आणि मिठाई (Janmashtami Recipe) बनवतात. जन्माष्टमीच्या विशेष प्रसंगी, बरेच भाविक नैवेद्य म्हणून 'छप्पन भोग' म्हणजेच 56 प्रकारचे विविध पदार्थ बनवतात. तर काही जण आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला आवडीची मिठाई सुद्धा अर्पण करतात. जाणून घ्या या जन्माष्टमीला तुम्ही कोणत्या प्रकारचे चविष्ट आणि आरोग्यदायी असलेले पदार्थ बनवू शकता? जे तुम्ही श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणूनही दाखवू शकाल.



पंचामृत
असे म्हणतात की, भगवान श्रीकृष्णाला पंचामृत खूप आवडते. पंचामृताला चरणामृत असेही म्हणतात. तर धार्मिक मान्यतांनुसार भगवान श्रीकृष्णाची पूजा पंचामृताशिवाय अपूर्ण राहते. त्यामुळे त्यांना निश्चितपणे पंचामृत अर्पण करावे. पंचामृत बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात दही, दूध, एक चमचा मध, तूप आणि साखर घालून चांगले मिसळा. तुम्हाला हवे असल्यास या सर्व गोष्टी तुम्ही मिक्सरमध्ये टाकूनही तयार करू शकता. यानंतर त्यात 8 ते 10 तुळशीची पाने टाका, आणि ड्रायफ्रुट्स टाका. पंचामृत मेंदूसाठी फायदेशीर असल्याचे शास्त्रात सांगितले आहे.



सुक्या मेव्याचे लाडू (ड्रायफ्रुट लाडू)
ड्रायफ्रूट लाडू हे खूप आरोग्यदायी मानले जातात, तसेच ते खूप चवदार देखील असतात. त्यामुळे जन्माष्टमीला तुम्ही सुक्या मेव्याचे लाडू बनवू शकता. यासाठी एक नॉन-स्टिक पॅन घ्या आणि त्यात 2 चमचे तूप घ्या, तूप चांगले तापले की त्यात एक वाटी कापलेले काजू, एक वाटी पिस्ता, अर्धी वाटी मनुके, एक चमचा वेलची पूड घाला. थोडा वेळ मंद आचेवर तळून घ्या आणि वेगळ्या प्लेटमध्ये काढा. हे मिश्रण थंड होऊ द्या, नंतर ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा, हे मिश्रण लहान लाडूच्या आकारात बनवून घ्या.


 


दुधीचा हलवा


जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही झटपट दुधी हलवाही बनवू शकता. हलवा रेसिपी बनवण्यासाठी 1 मध्यम आकाराची दुधी किसून घ्या. यानंतर कढई गरम करून त्यात तूप घालून सुका मेवा तळून घ्या आणि प्लेटमध्ये काढा. त्याच कढईत अजून थोडं तूप घालून किसलेला दुधीचा गर घाला. नंतर चवीनुसार साखर घालावी. यानंतर एक कप दुधाची मलई घाला, नंतर हलवा चांगला शिजवून घ्या. शिजल्यावर त्यात सुका मेवा घाला. सर्व पदार्थ चांगले मिसळा, आणि गरमगरम श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवा.



गुळाची खीर
सणासुदीच्या दिवशी खीर बनवण्याची परंपरा आहे, पण काही जणांना ही खीर बनवणे जरा अवघड वाटते. यासाठी एक भांडे घ्या, त्यात दोन लिटर बदाम मिश्रित दूध टाका आणि ढवळत राहा जेणेकरून दूध ऊतू जाणार नाही आणि सांडणार नाही. यानंतर तांदूळ घाला. खीर घट्ट होऊ लागली की त्यात केशर आणि वेलची घाला. खीर ढवळत असताना, गॅस बंद करा. त्यात आणखी मूठभर सुका मेवा घालून चांगले मिसळा. आरोग्याचा विचार करता त्यात साखरेऐवजी गुळाचा वापर करा. ही खीर भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणूनही अर्पण करता येते.



खजुराची बासुंदी
ही चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी बनवण्यासाठी एक मोठं भांडं घ्या, त्यात जवळपास 2 लिटर दूध घाला आणि ते ढवळत राहा, जेणेकरून दूध चिकटणार नाही. यानंतर खजूर सोलून मिक्सरमध्ये बारीक करा. दूध थोडे घट्ट झाल्यावर त्यात खजुराची पेस्ट घाला. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात सुका मेवा घाला. खजूरची बासुंदी फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा आणि नंतर प्रसाद म्हणून द्या.