Janmashtami 2023 Puja : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला (Krishna Janmashtami 2023) कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. श्रीकृष्ण (Shri-Krishna) हा श्री हरी विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कंसाच्या अत्याचारापासून लोकांना वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा जन्म माता देवकीच्या पोटी कारागृहात झाला. श्रीकृष्ण यांचा जन्म रात्री 12 वाजता झाला, त्यामुळे दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीची पूजा रात्री 12 वाजता केली जाते. यंदा जन्माष्टमी 6 तसेच 7 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये त्यांच्या श्रृंगाराला खूप महत्त्व आहे. त्यांच्यासाठी 56 प्रकारचे खाद्यपदार्थही तयार केले जातात. पण काकडीशिवाय भगवान श्रीकृष्णाची पूजा का अपूर्ण मानली जाते? येथे जाणून घ्या. 



काकडीशिवाय भगवान श्रीकृष्णाची पूजा का अपूर्ण मानली जाते?
ज्याप्रमाणे मातेच्या उदरातून मूल जन्माला येते आणि जन्मानंतर नाळ कापून मातेच्या गर्भाशयापासून वेगळे केले जाते, त्याचप्रमाणे जन्माष्टमीच्या दिवशी काकडीपासून बालगोपाळाचा जन्म होतो, अशी धारणा आहे. या दिवशी कृष्णाचे बालरूप सकाळपासून काकडीमध्ये ठेवतात. रात्री जन्माच्या वेळी बाळकृष्णाची मुर्ती काकडी बाहेर काढून मोठ्या थाटामाटात जन्मोत्सव साजरा केला जातो. काकडीपासून कृष्णाच्या जन्माच्या या प्रक्रियेला नाळ छेदन म्हणतात.



जन्माष्टमीला काकडीपासून बाळकृष्णाला जन्म देण्याची पद्धत


जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला, त्यामुळे रात्री 12 वाजता काकडीचे देठ नाण्याने कापून बाळकृष्णाला जन्म देण्याची पद्धत आहे. यानंतर शंख वाजवून कृष्णाचे स्वागत करून उत्सव साजरा करतात. त्यानंतर पूर्ण विधीपूर्वक श्रीकृष्णाची पूजा करतात, तसेच नैवेद्यात सुंठ तसेच पंचामृतासह काकडी अर्पण करतात. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला जन्म देण्यासाठी काकडी कापण्याच्या प्रक्रियेला 'नाळ छेदन' असे म्हणतात. या दिवशी पूजेच्या वेळी भगवान श्रीकृष्णाजवळ काकडी ठेवावी आणि रात्री 12 वाजता काकडी आणि तिच्या देठाच्या मध्ये एका नाण्याच्या साहाय्याने कापतात. या प्रक्रियेने बाल कृष्णाची नाळ वेगळी होते, अशी मान्यता आहे. 


बाळकृष्णाच्या पूजेत काकडीचे महत्त्व


जन्माष्टमीला कान्हाला काकडी अवश्य अर्पण करावी. अशी मान्यता आहे की, काकडी अर्पण केल्याने भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. ज्या काकडीने श्रीकृष्णाची नाळ बांधली गेली होती, ती काकडी गरोदर स्त्रीला खाऊ घातली तर श्रीकृष्णाप्रमाणेच गोंडस मूल जन्माला येते, असे मानले जाते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)