Guru Purnima 2023 : हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे. लोक गुरूला देवासारखे पूजनीय मानतात. गुरु पौर्णिमा (Guru Purnima 2023) किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. याच निमित्ताने महाराष्ट्रात शिर्डी, अक्कलकोटसह विविध ठिकाणी मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते.
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत उत्साहाचं वातावरण
शिर्डीमध्ये गुरूपौर्णिमा उत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळतोय. साईबाबांना गुरू स्वरूप मानत हजारो साईभक्त गुरूचरणी नतमस्तक होतायत. गुरुपौर्णिमेच्या आजच्या मुख्य दिवशी काकड आरती नंतर अखंड पारायण समाप्ती झाली. यावेळी श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे अध्यक्ष तसेच प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य तसेच जिल्हाधिकारी श्री. सिध्दाराम सालीमठ यांनी वीणा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर (भा.प्र.से.) आणि वैद्यकिय संचालक ले. कर्नल डॉ. शैलेश ओक यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
गुरूस्थान मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी
साई समाधी मंदिरासह भाविक गुरूस्थान मंदिरातही दर्शनासाठी गर्दी केल्याचं पहायला मिळतंय. साईबाबा बालफकिराच्या रुपात ज्या निमवृक्षाखाली प्रकटले त्या जागेला गुरूस्थान म्हणून ओळखले जाते. साईबाबा याच निमवृक्षाखाली ध्यान धारणा करत असत. गुरूस्थानजवळील निमवृक्षाला प्रदक्षिणा घालून भाविक गुरूला नमन करत असून साईनामाच्या जयघोषाने परिसर दुमदूमून गेला आहे.
श्री क्षेत्र अक्कलकोटची प्रसिद्ध काकड आरती
श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिध्द आहे. श्री स्वामी समर्थ यांना दत्ताचा अवतार मानले जाते. या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली असते. विशेष म्हणजे, पहाटे 5 वाजता या ठिकाणी स्वामींची काकड आरती केली जाते. मागील गेल्या 10 दिवसांपासून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आणि धर्मकिर्तन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री अक्कलकोट येथील मंदिराला भेट देण्यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर परराज्यातील भाविक सुद्धा हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून 38 कि.मी अंतरावर वसलेले आहे.
गुरू पौर्णिमेनिमित्त शेगावात भक्तांची गर्दी
आज गुरुपौर्णिमा अर्थात गुरुला वंदन करण्याचा दिवस त्यानिमित्त शेगावत संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे . आज सकाळपासूनच शेगावच्या मंदिर परिसरात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या दाखल झाले आहेत. गुरु पौर्णिमेनिमित्त आज शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन सुद्धा करण्यात आल आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Guru Purnima 2023 : आज गुरुपौर्णिमा! यानिमित्त जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्तमंदिर