Guru Purnima 2023 : आज गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2023). हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमीच उच्च स्थान देण्यात आलं आहे. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूची प्रार्थना करण्याचा, त्यांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे.
दत्तभक्तांसाठी हा पुण्यपावन दिवस आहे. या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पूजा करतात. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतात. महाराष्ट्रात अशीच काही प्रसिद्ध दत्तमंदिरं आहेत. त्यांच्याविषयी या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
1. श्री क्षेत्र दत्तभिक्षालिंग मंदिर, कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील रविवार पेठेतील आझाद चौकामध्ये श्री दत्तभिक्षालिंग मंदिर हे जागृत दत्त स्थान असून प्राचीन काळापासून या महत्त्वाच्या स्थानात या क्षेत्राची गणना होते. माध्यान्हकाळी श्री दत्तप्रभू इथेच जगदंबेकडून भिक्षा ग्रहण करतात. त्या स्थानी नवनाथांपैकी एक वटसिद्ध नवनाथांनी श्री दत्तप्रभूंना भिक्षादान केले होते. तसेच श्री गोरक्षनाथांनी दत्त महाराजांची भिक्षाक्षेत्राची झोली येथील श्रीदत्त भिक्षालिंग स्थानापासून सुरु केली होती.
2. श्री एकमुखी दत्त मंदिर, कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील एकमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती 18 व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे. पूर्ण मूर्ती महादेव लिंगाच्या आकारात एकाच पाषाणात असून 5 फूट (पूर्ण पुरुष) अशी रचना आहे. मूर्ती पश्चिमाभिमुख असून उजव्या बाजूच्या एका हातात जपमाळ, दुसर्या हातात कमंडलू, तिसर्या हातात डमरू आणि डाव्या बाजूच्या एका हातात त्रिशूळ, दुसर्या हातात शंख अन् तिसर्या हातात योगदंड आहे. मूर्तीच्या मस्तकावर शिवपिंडी आहे. मूर्ती दगडी चबुतर्यावर उभी आहे. मंदिराबाहेरच समोर नंदीसह महादेव मंदिर आहे.
3. श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर, कोल्हापूर
दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं.
4. श्री क्षेत्र अक्कलकोट
श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिध्द आहे. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून 38 कि.मी अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. श्री स्वामी समर्थांची समाधी भक्ताकडून पुजली जाते. या ठिकाणी दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर पर राज्यातूनही मोठ्या संख्येने भक्त गण नित्य नेमाने भेट देतात.
5. श्री क्षेत्र गाणगापूर, सोलापूर
गाणगापूर (ganagapur) ग्रामी श्रीदत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव मानले जातात. कोटी भाविकांची श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वत: गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे. गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्तरुपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे. हे मंदिर सोलापूर- गुलबर्गा स्टेशनमध्ये गाणगापूर रोड रेल्वे स्टेशनपासून 20 कि. मी. आहे.
6. नरपतगीर दत्त मंदिर, मंगळवार पेठ. पुणे
या मंदिरात, आई अनसूया आणि वडील अत्री ऋषी यांच्याबरोबर दत्तगुरू विराजमान झाले आहेत. या तिन्ही मूर्ती काळ्या पाषाणात घडविलेल्या असून त्यांना अंगचीच प्रभावळ आहे. दत्ताची अशी बैठी मूर्ती फार दुर्मीळ आहे. केईएम हॉस्पिटल जवळ, नरपतगीर चौक, मंगळवार पेठ पुणे या ठिकाणी हे दत्तमंदिर आहे.
7. श्रीपाद श्रीवल्लभ, सदाशिव पेठ, पुणे
सुप्रसिद्ध हत्ती गणपती मंदिरामागे दडलेल्या मारुती मंदिरात आणि संगमरवरी देवघरात श्रीपाद श्रीवल्लभ अवतारातील दत्त मूर्ती आहे. श्रीवल्लभ इथे हाताची घडी घालून मांडी घालून बसले आहेत. मागे गाय आणि श्वान यांच्या प्रतिमा आहेत. श्रीवल्लभ अवतारात असलेले असे पुण्यातील हे एकमेव मंदिर असावे. मारुती नवग्रह मंदिर, टिळक रोड, सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी हे दत्तमंदिर आहे.
8. श्री क्षेत्र औदुंबर, सांगली
सांगली जिल्ह्यातील तीर्थ क्षेत्रापैकी औदुंबर हे एक श्री दत्तात्रयांचे जागृत स्थान आहे. तासगाव तालुक्यात भिलवडी गावाजवळ कृष्णा नदीच्या पवित्र काठी रम्य वनश्रीमध्ये हे देवालय आहे. देवालयामध्ये श्री दत्तांच्या पादुका आहेत. या श्रीक्षेत्राच्या परिसर विकासाचे महत्वपूर्ण कार्य शासनाने हाती घेऊन घाट बांधला आहे. या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येतात.
महत्त्वाच्या बातम्या :
Guru Purnima 2023 : गुरु: साक्षात् परब्रह्म! गुरुपौर्णिमेचं महत्त्व नेमकं काय? जाणून घ्या इतिहास