Guru Purnima 2023 : दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2023) किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. महाभारत, पुराणे लिहिलेल्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा दिवस आहे. या वर्षी गुरुपौर्णिमा सोमवार, 3 जुलै 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी गुरुंचे पूजन केले जाते. वेद व्यासांच्या जन्मामुळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी व्यास जयंतीही साजरी केली जाते.
आपल्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वात महत्त्वाचं स्थान समजलं जातं. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गुरुचे आभार मानण्यासाठी म्हणून भारतात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. महाभारत या महाकाव्याचे निर्माते असलेल्या व्यास ऋषींच्या कार्याच्या स्मरणात भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
गुरुपौर्णिमेचं महत्त्व (Guru Purnima Importance 2023)
गुरुपौर्णिमाचा संदर्भ हा प्राचीन भारताच्या इतिहासात सापडतो. आपल्या भारतात गुरु-शिष्य परंपरेला खूप मोठी परंपरा आहे. पुराणशास्त्राच्या दाखल्यानुसार, महाभारत या महाकाव्याचे निर्माता व्यास ऋषींनी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिष्यांना आणि इतर ऋषींना वेद आणि पुराणांचे ज्ञान दिलं होतं. याच दिवसाचे स्मरण म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
भारतात गुरुला ब्रम्हा, विष्णू आणि महेशाचं रुप समजलं जातं. गुरु हा साक्षात परब्रमह्म असल्याचं सांगितलं जातं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देशातल्या शाळांमध्ये गुरुप्रती विद्यार्थी आदर व्यक्त करतात. त्यांचे आशिर्वाद घेतात. शाळा, महाविद्यालयं किंवा आध्यात्मिक गुरु, कला किंवा विद्या शिकवणारे गुरु यांचं पूजन केलं जातं आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
गुरुपौर्णिमेचा इतिहास (Guru Purnima History 2023)
व्यास ऋषींनी महाभारत या महाकाव्याबरोबर इतर सहा शास्त्रांची आणि 18 पुराणांची निर्मिती केली होती. प्राचीन काळापासून त्यांच्या या निर्मितीचे ज्ञान भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात येतं. या व्यतिरिक्त व्यासांनी श्रीमद भागवत पुराणाची निर्मिती केली आहे. त्यामध्ये त्यांनी विष्णूच्या अवतारांचे वर्णन केलं आहे. या सर्वांचे ज्ञान त्यांनी आपल्या शिष्यांना पौर्णिमेच्या दिवशी दिलं होतं. त्याचे स्मरण म्हणून या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या :