Ganeshotsav Travel : मंगलमूर्ती...सुखकर्ता...विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सध्याचं चित्र पाहायला गेलं, तर अवघ्या देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेश उत्सवानिमित्त अनेक लोक देशातील पवित्र आणि प्रसिद्ध गणेश मंदिरांना भेट देण्यासाठी येतात, परंतु फार कमी लोकांना माहित नसेल, अशी अनेक गणेश मंदिरे आहेत, जी रहस्यमय मंदिरं मानली जातात. ज्यांच्याबद्दल अनेक पौराणिक कथा, भाविकांच्या श्रद्धा प्रचलित आहेत. ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्हीही थक्क व्हाल.


 


त्रिनेत्र गणेश मंदिर - रामायण, द्वापार युगातील उल्लेख


देशातील प्राचीन गणेश मंदिरांचा उल्लेख केल्यावर अनेक लोक प्रथम त्रिनेत्र गणेश मंदिराचे नाव घेतात. हे प्रसिद्ध मंदिर राजस्थानच्या सवाई माधोपूरपासून 13 किलोमीटर अंतरावर रणथंबोर किल्ल्याच्या आत आहे. त्रिनेत्र गणेश मंदिराविषयी असे म्हटले जाते की, हे देशातील एकमेव असे मंदिर आहे जेथे भगवान गणेश आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहतात. या पवित्र मंदिराचा उल्लेख रामायण काळात आणि द्वापार कालखंडातही असल्याचे सांगितले जाते. पौराणिक मान्यतेनुसार प्रभू रामाने लंकेला जाण्यापूर्वी या मंदिरातील गणेशाचा अभिषेक केला होता.


 




श्री विनायक मंदिर - मनोकामना पूर्ण करणारा श्रीगणेश


दक्षिण भारतात अनेक पवित्र आणि प्रसिद्ध गणेश मंदिरे आहेत, परंतु जेव्हा देशातील प्राचीन गणेश मंदिराचा उल्लेख केला जातो, तेव्हा कर्नाटकात असलेल्या श्री विनायक मंदिराचे नाव नक्कीच घेतले जाते. हे मंदिर कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापुरा येथे आहे. श्री विनायक मंदिर, भगवान गणेशाला समर्पित, हे देशातील एकमेव जलाधिवास गणपती मंदिर असल्याचे म्हटले जाते. भाविकांच्या श्रद्धेनुसार, खडकातून गणेशाची तीन फुटांची मूर्ती स्वतःहून निघाली होती. असे मानले जाते की, जो खऱ्या मनाने येथे पोहोचतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते.




चिंतामण मंदिर - जिथे भगवान गणेश स्वतः पृथ्वीवर अवतरले


मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या महाकाल मंदिराविषयी जवळपास सर्वांना माहिती असेल, परंतु उज्जैनमध्ये असलेल्या चिंतामण मंदिराबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. हे एक रहस्यमय मंदिर मानले जाते. चिंतामण मंदिराविषयी अशी एक समजूत आहे की हे देशातील एकमेव असे मंदिर आहे. ज्याच्या बांधकामासाठी भगवान गणेश स्वतः पृथ्वीवर आले होते. या मंदिराबाबत आणखी एक समज अशी आहे की प्रभू रामाने आपल्या वनवासात या मंदिराची स्थापना केली होती. श्रद्धेनुसार जो खऱ्या मनाने येथे पोहोचतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.




कानिपकम गणेश मंदिर - गणेशमूर्ती आपोआप वाढते


दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात स्थित कनिपकम गणेश मंदिर हे एक प्रसिद्ध आणि रहस्यमय मंदिर मानले जाते. या मंदिराविषयी लोककथा अशी आहे की हे देशातील एकमेव असे मंदिर आहे जिथे मूर्ती स्वतःच वाढत राहते. कानिपकम गणेश मंदिर हे एक मंदिर आहे. जिथून नदी वाहते. कनिपकम गणेश मंदिरात जाण्यापूर्वी जो कोणी या नदीत स्नान करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.


 


हेही वाचा>>>


Ganeshotsav Travel : अतिशय सुंदर निसर्गसौंदर्य.. जिथे गणेशोत्सवाचा उत्साहच निराळा! कोकणातील 'एक' आकर्षक गाव, फार कमी लोकांना माहित


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )