मुंबई : हिंदू धर्मातील आराध्य दैवत म्हणजे सर्वांचा लाडका गणपती बाप्पा (Ganpayi Bappa). पौराणिक मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा (Shri Ganesha) जन्म झाला. यामुळेच हा दिवस गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून तिथी स्थापना करतात आणि श्री गणेशाची मनोभावे पूजा करतात. फक्त भारतातच नाही तर विदेशातही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. देश-विदेशात गणेशभक्तांसाठी हा महत्त्वाचा सण आहे.


आतुरता आगमनाची...


भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीपासून ते अनंत चुर्तदशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला श्री गणेशाचं आगमन होतं आणि अनंत चुर्तदशीला गणपतीचं विसर्जन होतं. यंदा 19 सप्टेंबर रोजील श्री गणेश चतुर्थी आहे. श्री गणेशाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आणि स्थापनेची विधी काय आहे, हे सविस्तर जाणून घ्या.


श्री गणेश स्थापनेचा मुहूर्त


यंदाच्या वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 ला आहे. पंचांगानुसार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी चतुर्थीला सुरुवात होते आणि 19 सप्टेंबर रोजी 1 वाजून 42 मिनिटांनी चतुर्थी समाप्ती होते. त्यामुळे श्री गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला साजरी केली जाईल आणि या दिवसापासूनच गणेशोत्सवाला सुरुवात होईल. श्री गणेशाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 7 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत आहे.


यंदा गणेश चतुर्थीला 2 शुभ योग


यंदा गणेश चतुर्थी म्हणजे विनायक चतुर्थीला दोन शुभ योग तयार होणार आहेत. पंचांगानुसार, यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी वैधृति योग आहे. यासोबतच स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्र यांचा संगम होण्याचाही दुर्मिळ योग आहे. त्यामुळे या दिवशी श्रीगणेशाची पूजा आणि आराधना करणाऱ्यांची विघ्न गणपती बाप्पा नक्की दूर करतील.


श्री गणेश स्थापना विधी (Ganesh Sthapna Vidhi)


श्री गणेशाची स्थापना करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करुन कपाळावर टीळा लावा आणि पूर्वेकडे तोंड करुन आसनावर बसा. यानंतर लाकडी पाटावर लाल कापड पसरून त्यावर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करा. तसेच गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला रिद्धी-सिद्धीची स्थापना करा आणि प्रत्येकी एक सुपारी ठेवा.


श्री गणेश चतुर्थीची पूजा पद्धत


गणेश चतुर्थी तिथीला शुभ मुहूर्तावर घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात श्री गणेशाची स्थापना करा. पूजेचे साहित्य घेऊन आसनावर बसा. पूजेच्या स्थानावर पविक्ष गंगा जल शिंपडा. श्री गणेशाच्या मूर्तीच्या पूर्व दिशेला कलश ठेवा आणि आग्नेय दिशेला दिवा लावा. स्वतःवर पाणी शिंपडताना ओम पुंडरीकाक्षय नमः या मंत्राचा जप करा. गणपतीला नमस्कार करून तीन वेळा पवित्र जल ग्रहन करून कपाळावर टीळा लावा. दिवा लावा. गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल, दुर्वा, जाणवं, पान सुपारी अर्पण करा. यानंतर गणपती बाप्पाला वस्त्र, चंदन, अक्षता, धूप, नैवेद्य आणि फळे अर्पण करा. श्री गणेशाची आरती करा आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद मागा.


श्री गणेश चतुर्थी : 19 सप्टेंबर 2023


श्री गणेश स्थापना शुभ मुहूर्त : सकाळी 11 वा. 7 मिनिटे ते दुपारी 1 वा. 34 मिनिटे.