मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बैठकांचा सिलसिला आजही सुरु राहणार आहे. आज सकाळी दहा वाजता काँग्रेसची बैठक होणार आहे. यानंतर राज्यात सरकार स्थापनेबाबतचा तिढा सोडवण्यासाठी आघाडीचे नेते पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत. शरद पवारांच्या निवासस्थानी काल (20 नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे आज त्यावर पुढील चर्चा होणार आहे.


दरम्यान या चर्चेनंतर आघाडीचे नेते मुंबईत येतील आणि उद्या (22 नोव्हेंबर) शिवसेनेसोबत चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद?
नवी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. कारण शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीने तत्वत: मंजुरी दिली आहे, अशी माहिती नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. महाशिवआघाडीत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा तर दुसरी अडीच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा कारभार हाती घ्यावा : संजय राऊत
महाराष्ट्राचा कारभार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हाती घ्यावा, अशी सगळ्यांची इच्छा असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. आघाडीच्या बैठकीनंतर सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.  दरम्यान, संजय राऊत आज (21 नोव्हेंबर) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. खरंतर ही भेट रात्री होणार होती. परंतु रात्री उशिरापर्यंत पवारांच्या निवासस्थानी बैठक सुरु असल्याने राऊत आज सकाळी त्यांच्या भेटीला जाणार आहेत.

...तर आम्ही डोकी फोडू : अब्दुल सत्तार
शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही डोकी फोडू, असा गर्भित इशारा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. घोडेबाजारांच्या शक्यतेने सत्तार अधिक आक्रमक झालेले दिसले. तर आठवड्याभरात महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होईल, असा पुनरुच्चारही सत्तार यांनी केला आहे.

संबंधित बातम्या