मुंबई : जगभरात दरवर्षी जवळपास 50 हजार लोक पाठीच्या कण्याला मार लागल्याने अधू होतात. स्पायनल कॉर्डच्या इजेमुळे कमरेखालच्या भागावरचं नियंत्रण जातं, पायांची हालचाल करता येत नाही. अंथरुणाला खिळून असलेल्या अशा हजारो रुग्णांसाठी हे संशोधन म्हणजे आशेचा किरण आहे.

काय आहे संशोधन?

अपघातात पाठीच्या कण्याला मार लागल्याने दोन माकडांचा कमरेखालचा भाग अधू झाला होता. त्या पॅरालिसिसवर उपचार सुरु झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा, एक्सपिरिमेंटल मेडिसिन म्हणजेच प्रायोगिक वैदकशास्त्राचा वापर केला गेला. माकडाच्या अंगात वायरलेस चिप बसवल्या गेल्या, त्यांनी मेंदू आणि पाठीचा कणा यांच्यात दुव्याचं काम केलं आणि यातल्या एका जखमी माकडाने पुन्हा पाय उचलायला सुरुवात केली. या संशोधनात पहिल्यांदाचा वायरलेस चीपचा वापर केला गेला.

कशी साधली किमया?

लकव्यामधे मेंदूकडून आदेश तर जातात पण पाठीचा कण्यात बिघाड झाल्याने, तो आदेश पायाकडे जात नाही, त्यामुळे पायाची हालचाल होत नाही. त्यासाठी "Brain-Spine Interface" मेंदू आणि पाठीचा कणा यातला दुवा तयार केला गेला. शेकडो इलेक्ट्रोड्स असलेलं इम्प्लान्ट किंवा छोटी चिप माकडाच्या मेंदूत बसवली गेली, दुसरी चिप बिघाड झालेल्या किंवा निकामी भागाच्या खाली लावली गेली.

मेंदुकडून मिळणारे आदेश-संकेत बाहेर कॉम्पूटरकडे वळवले गेले तिथे डिकोड केले गेले, तिथून ते सिग्नल खराब भागाला बायपास करुन थेट खालच्या चिपला म्हणजेच पायांच्या नर्व्हला – मज्जातंतूला पाठवले गेले. ते आदेश मानून यातल्या एका माकडाने तर प्रयोगाच्या सहाव्या दिवशी अपेक्षित हालचाल केली.

हे संशोधन महत्वाचं का आहे?

कुठल्या न कुठल्या कारणाने पाठीच्या कण्याला मार लागून जगभरात दरवर्षी अंदाजे 50 हजार लोक अधू होतात. स्पायनल कॉर्डच्या इजेमुळे कमरेखालच्या भागावरचं नियंत्रण जातं, पायांची हालचाल करता येत नाही. अंथरुणाला खिळून असलेल्या अशा हजारो रुग्णांसाठी हे संशोधन आशेचा किरण आहे.

कुठे सुरु आहे हे संशोधन?

चमत्कार म्हणता येईल असं हे संशोधन स्वित्झर्लंडच्या EPFL संस्थेत सुरु आहे. EPFL म्हणजे ल्युझान फेडरल इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. या संस्थेत गेली काही दशकं पॅराप्लेजिक म्हणजे शरीराचा खालचा भाग पक्षाघात किंवा लकव्यानं निकामी होण्याच्या आजरावर संशोधन सुरुय. ग्रेगॉर कॉर्टिन हे सध्या संचालक आहेत, त्यांनीच हे संशोधन पुढे नेलं आहे.

हे माणसांमध्ये वापरता येईल?

आधी जखमी उंदरांवर केलेले प्रयोग यशस्वी झाले आहेत. आता थेट माकडांच्याही पायात बळ आल्यानं शास्त्रज्ञ आशावादी आहेत. मात्र हे वायरलेस इम्प्लान्ट तंत्र माणसांमध्ये वापरणं खूप जटील आहे आणि त्याला बराच अवधी आहे. सध्या माणसांवर काही प्रयोग सुरु आहेत, पण ते संशोधन प्राथमिक अवस्थेत आहे. आणखी किमान दहा वर्ष तरी जोमानं प्रयोग आणि संशोधन करावं लागेल असं ग्रेगॉर सांगतात. अंथरुणाला खिळलेला रुग्ण थेट उठून चालायला लागणार नसला तरी त्याचं आयुष्य थोडं सुसह्य बनेल अशी आशा ग्रेगॉरला आहे.