मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अचानक नोटा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा आहे. नोटा बदलण्यासाठी मुदत वाढवायला हवी, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. मोदींनी अचानक नोटा बदलून लोकांच्या विश्वासाची प्रतारणा केली, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.


500 आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

 स्वीस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक कधी?

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "काळा पैसा बाहेर यायला हवा यात दुमत नाही. मात्र अचानक नोटा रद्द केल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. 500-1000 रुपयांच्या नोटांवर सर्जिकल स्ट्राईक केला, मग स्वीस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक कधी?"

तसंच नोटा बदलण्याला विरोध नाही, नागरिकांना होणारा त्रास थांबवा, नोटा बदलण्याची मुदत वाढवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जनतेचा सर्जिकल स्ट्राईक भारी पडेल

मोदींच्या निर्णयामुळे नेत्यांना त्रास नाही, सामान्य लोकांना त्रास होत आहे. मोदींकडून लोकांच्या विश्वासाशी प्रतारणा झाली. अचानकपणे नोटा रद्द केल्याने सामान्य लोकांना त्रास होत आहे. जनतेने जर सर्जिकल स्ट्राईक केले, तर भारी पडेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

जनतेला रस्त्यावर आणून मोदी जपानला

नोटा रद्द केल्याने देशभरात एटीएम आणि बँकांसमोर सामान्य लोकांच्या रांगा लागल्या आहेत. नोटा बदलण्याच्या आधीच बँकांमध्ये नोटा उपलब्ध करायला हव्या होत्या. सामान्य जनतेला रस्त्यावर आणून देशाचे पंतप्रधान जपानला गेले. जनतेने विश्वासाने निवडून दिलंय, त्यांचा विश्वासघात करु नये, असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.