Coronavirus : कोरोना व्हायरसच्या इतर व्हेरियंट्सच्या तुलनेत नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग अधिक वेगानं होतो. यापूर्वी खोकताना किंवा शिंकताना नाका-तोंडातून बाहेर येणाऱ्या ड्रॉपलेट्समुळे संसर्ग पसरत होता. परंतु, आता श्वासातूनही संसर्ग पसरत असल्याचं दिसून येत आहे. तज्ज्ञांनी ओमायक्रॉनपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
न्यू अँड इमर्जिंग रेस्पिरेटरी व्हायरस थ्रेट्स अॅडव्हायझरी ग्रुपचे (Nervtag) प्रोफेसर पीटर ओपेनशॉ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ब्रिटनमध्ये जवळपास 90 टक्के रुग्णांसाठी ओमायक्रॉन व्हेरियंट जबाबदार आहे. लवकरच हे प्रमाण डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त होणार आहे. अनेक संशोधनांमध्ये ओमायक्रॉनची लक्षणं सौम्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. यूकेमधील एका अहवालानुसार, ओमायक्रॉनची बाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याचा धोका इतर व्हेरियंट्सच्या तुलनेत 50 ते 70 टक्क्यांपर्यंत कमी आहे."
ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी हेल्थ एक्सपर्ट कोविड वॅक्सिनचा बुस्टर शॉट देण्याची शिफारस करत आहेत. बुस्टर डोस अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. डॉ. पीटर यांनी बीबीसीच्या एका कार्यक्रमात ओमायक्रॉनचा अधिक वेगानं फोफावत असल्याचं सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, आपण अत्यंत नशीबवान होतो कारण, सुरुवातीला व्हायरस फारसा संक्रामक नव्हता. आम्ही हा व्हायरस अनेक टप्प्यांमध्ये म्युटेट होताना पाहिला आहे.
डॉ. पीटर म्हणाले की, "आता व्हायरस एवढा वेगानं पसरतोय की, हा बाधित व्यक्तीच्या श्वासातूनही पसरु शकतो. कोणतीही व्यक्ती अगदी सहज याच्या विळख्यात अडकू शकते." त्यामुळे लोकांना आधीपेक्षा जास्त सतर्क राहण्याची गरज आहे." दरम्यान, भारतात ओमायक्रॉनचे आतापर्यंत 1500 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉनमुळे वेगानं पसरणाऱ्या संसर्गामुळे आरोग्य अधिकारी लोकांना सावध करण्याचं काम करत आहेत.
दरम्यान, देशात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटचे 1525 रुग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत 23 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीमध्ये आढळून आले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 460 रुग्ण, दिल्लीत 351 रुग्ण तर गुजरातमध्ये 136 रुग्णांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :