Omicron: ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतून दिलासा देणारी माहिती समोर आलीय. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालीय. परंतु, मृत्यूच्या संख्येत किरकोळ वाढ झाल्याचं सरकारच्या एका निवेदनात म्हटलंय. दरम्यान, रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर देशातील नाईट कर्फ्यूचे नियमही हटवले आहेत. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर देशात कडक निर्बंध लागू करण्यात आले. परिणामी, देशातील रुग्ण संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं देशातून कोरोनाचे इतर निर्बंधही शिथिल केले जाणार आहेत. 


दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आलेल्या ओमायक्रॉननं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं होतं. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं डेल्टा आणि ओमायक्रॉन संक्रमणांच्या लाटेबद्दल संपूर्ण जगाला सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेतील रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागलीय. देशभरातील जवळजवळ सर्व राज्यांमधील रुग्णांच्या संख्येत घट झालीय. तर, दररोज रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या दरातही घट झालीय, असं दक्षिण आफ्रिकेच्या विशेष मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या निवेदनात म्हटलंय. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत 1 लाख 27 हजार 753 नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र, डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. या शेवटच्या आठवड्यात 89 हजार 781 रुग्णांची नोंद करण्यात आली. 


दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून नाईट कर्फ्यू हटवण्यात आलाय. तसेच सामान्य परवाना नियमांनुसार व्यवसायांना अल्कोहोल विकण्याची परवानगी दिली जाईल. सार्वजनिक कार्यक्रमाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी 1000 आणि खुल्या जागेत 2000 जणांना परवानगी असेल किंवा जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना कार्यक्रमात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलीय. देशातील नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक असून सार्वजनिक आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलंय. 


महत्वाचे म्हणजे, नॅशनल कोरोनाव्हायरस कमांड कॉन्सिल येथील कोरोना परिस्थितीचे निरीक्षण करेल. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यास आणि रुग्णालयावर ताण येऊ लागल्यास पुन्हा निर्बंध कडक केले जातील, असाही इशारा देण्यात आलाय.  दक्षिण आफ्रिकेत जवळपास 3.5 दशलक्ष कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय.  दक्षिण आफ्रिकेत इतर देशांच्या तुलनेत कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेत कोरोनामुळं 90 हजारांहून अधिक नागरिकांनी प्राण गमावले आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha