मुंबई: एखादा माणूस किंवा लहान मूल जरी थोडं जाडजुड असेल तर त्याला आपल्या इकडे खात्यापित्या घरातला असं म्हटलं जातं, पण कधीही जाडपणा (Obesity) हा एक आजार आहे आणि त्यावर गंभीरपणे लक्ष द्यायला हवं असं म्हटलं जात नाही. पण लॅन्सेट या जगप्रसिद्ध संस्थेच्या आकडेवारी मुळे भारतातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
द लॅन्सेट हे एक वैद्यकीय नियतकालिक आहे. हे जगातील सगळ्यात जुने आणि सर्वाधिक मान्यतेचे वैद्यकीय नियतकालिक समजले जाते. याच द लॅन्सेट मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले, की भारत संभाव्य लठ्ठपणाच्या साथीचा सामना करत आहे, विशेषत: तरुणांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे येणाऱ्या काळात भारत लठ्ठपणा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध आजारांनी ग्रासलेल्या लोकसंख्येचा सर्वात मोठा देश असेल अशी भीती आहे.
काय सांगते आकडेवारी?
द लॅन्सेटच्या अभ्यासानुसार भारतात 2022 मध्ये 20 वर्षांवरील 44 दशलक्ष महिला आणि 26 दशलक्ष पुरुष लठ्ठ होते. 1990 मध्ये लठ्ठपणाचे हेच प्रमाण 2.4 दशलक्ष महिला आणि 1.1 दशलक्ष पुरुष असे होते. तसेच 2022 मध्ये, 5 ते 19 वयोगटातील तब्बल 12.5 दशलक्ष मुलांचे, ज्यामध्ये 7.3 दशलक्ष मुले आणि 5.2 दशलक्ष मुलींचे स्थूलपणे जास्त वजन असल्याचे आढळून आले, 1990 मध्ये हीच आकडेवारी केवळ 0.4 दशलक्ष इतकी होती.
हा एक अतिशय चिंतेचा विषय आहे, याचे कारण म्हणजे भारताला आधीच हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतोय. त्यात लठ्ठपणा वाढल्याने या आजारांचे प्रणाम देखील वाढत आहे. लठ्ठपणा किशोरवयीन मुलांमध्ये देखील या आजारांचे प्रमाण वाढवतो. विशेषतः लठ्ठ किशोरवयीन मुलांमध्ये डायबिटीस टाईप 2 हमखास दिसून येत आहे.
या संदर्भात जो अभ्यास केला गेला त्यासाठी 1990 पासून जमवलेली माहिती वापरण्यात आली. तसेच 1990 सालाची आकडेवारी आणि 2022 सालची आकडेवारी यांची तुलना करण्यात आली. त्यातून अनेक धक्कादायक वास्तव समोर आले. अभ्यासात म्हटले आहे की, भारतात लठ्ठपणाचे प्रमाण 1990 मध्ये 1.2% वरून 2022 मध्ये 9.8% पर्यंत वाढले आणि 2022 मध्ये पुरुषांसाठी 0.5% वरून ते 5.4% झाले. मुलींसाठी लठ्ठपणाचे प्रमाण 1990 मधील 0.1% वरून 2022 मध्ये 3.1% पर्यंत आणि 2022 मध्ये मुलांसाठी 0.1% ते 3.9% पर्यंत वाढले आहे. NCD Risk Factor Collaboration (NCD-RisC) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे जागतिक डेटाचे विश्लेषण करून असा अंदाज लावला आहे की जगातील मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये 2022 मध्ये लठ्ठपणाचा दर 1990 मधील दराच्या चौपट होता.
किती वजन असल्यास व्यक्ती जाडेपणाच्या श्रेणीत मोडते?
ही समस्या फक्त भारतालाच भेडसावत नाही तर संपूर्ण जगाला भेडसावत आहे. द लॅन्सेटच्या अहवालात प्रकाशित झालेल्या जागतिक अंदाजानुसार, जगभरात एक अब्जाहून अधिक लोक लठ्ठ आहेत. 2022 च्या आकडेवारीनुसार यामध्ये सुमारे 88 कोटी प्रौढ आणि 15.9 कोटी मुलांचा समावेश आहे. सुमारे 190 देशांच्या या यादीत ब्रिटन पुरुषांसाठी 55 व्या आणि महिलांसाठी 87 व्या स्थानावर आहे. अमेरिकन पुरुष या यादीत 10 व्या आणि महिला या यादीत वरुन 36 व्या स्थानावर आहेत. चिनी महिला 179 व्या आणि पुरुष 138 व्या स्थानावर आहेत. तर भारतीय महिला 190 देशांच्या यादीत 171 व्या आणि पुरुष 169 व्या स्थानावर आहेत. पण भारतात हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारतर्फे केलेले प्रयत्न कमी असल्याचे तज्ञ सांगता.
जागतिक आरोग्य संघटनेने परिभाषित केल्यानुसार, लठ्ठपणा म्हणजे चरबीचा एक असामान्य किंवा जास्त संचय आहे ज्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआय (BMI) म्हणजे उंचीच्या प्रमाणातलं वजन. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार 25 पेक्षा जास्त BMI असेल तर तुम्ही ओव्हरवेट असता म्हणजे तुमचं वजन गरजेपेक्षा जास्त आहे, असं मानलं जातं. पण यावर देखील उपाय आहेत.
लठ्ठपणाच्या समस्येपासून वाचवण्यासाठी मुलांना कोणता आहार द्याल?
मुलांना संतुलित आहार दिला, ज्यात कर्बोदकं (कार्बोहायड्रेट्स), प्रथिनं, जीवनसत्व, फळं आणि भाज्यांचा समावेश असेल, तर कुपोषण आणि अतिपोषण हे दोन्ही रोखता येतील. फिट आणि निरोगी राहण्यासाठी दररोज किमान 60 मिनिटे शारीरिक हालचाली करण्याची डॉक्टर शिफारस करतात. मुलांसाठी अस्वास्थ्यकर अन्न आणि शीतपेयांची विक्री, मुलांसाठी लक्ष्यित जंक फूड जाहिरातींवर प्रतिबंध, स्पष्ट पोषण लेबलिंग आणि शाळेच्या कॅफेटेरियामध्ये आरोग्यदायी पर्यायांचा प्रचार करणे आवश्यक आहे.
लठ्ठपणा नक्कीच एक मोठी समस्या आहे. मात्र ती सोडवण्यासाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारताने या आधी देखील पोलिओ सारख्या मोठ्या आजारावर मात मिळवली आहे. त्यामुळे भारताला लठ्ठपणावर मात मिळवता येईल. तसे केले तरच भारताचे भविष्य ज्या पिढीवर अवलंबून आहे, त्या पिढीला डायबिटीस, हृदयरोग, ब्लड प्रेशर आणि तश्या आजारांपासून वाचवता येईल.
आणखी वाचा
200 किलो वजन केलं कमी, जगातील सर्वात लठ्ठ महिलेचा प्रेरणादायी प्रवास