Pooja Sawant And Siddhesh Chavan Wedding : सध्या मराठी सिनेसृष्टीत लगीनसराई सुरु आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे (Teetiksha Tawde) आणि सिद्धार्थ बोडके (Sidharth Bodke), अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि क्षितीजा घोसाळकर तसेच अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant)-सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chavan) यांनी त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. या कलाकार मंडळींच्या लग्नसोहळ्याला त्यांच्या कलाकार मित्र मंडळींनी देखील हजेरी लावली होती. लाडक्या मित्र मैत्रणींचं लग्न या कलाकार मंडळींनी अगदी आनंदानं पार पाडलं. नुकतचं अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हीने तिच्या इन्स्टाग्रामवर पूजाच्या लग्नातील एक गोड क्षण शेअर केला आहे.
प्रार्थनाने पूजा आणि सिद्धेशच्या लग्नात त्यांची लग्नगाठ बांधली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून पूजा आणि सिद्धेशच्या लग्नाची बरीच चर्चा होती. त्यातच पूजाने 28 फेब्रुवारी रोजी सिद्धेशसोबत लग्नगाठ बांधली. प्रार्थनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केलाय. प्रार्थनाने तिचा नवरा अभिषेकसोबत सिद्धेश आणि पूजाची लग्नगाठ बांधल्याचा फोटो शेअर केलाय. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्यात.
मैत्रीणीच्या लग्नात प्रार्थना भावूक
प्रार्थानाने हा फोटो तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर करत, त्याला कॅप्शन देखील दिलं आहे. तिने म्हटलं की, नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली. तिच्या या फोटोवर पूजा आणि तिच्या चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळींनी देखील कमेंट्स केल्यात. त्यामुळे सध्या प्रार्थनाचा हा फोटो सोशल मीडियावर बराच चर्चेत आलाय.
पूजा-सिद्धेशच्या लग्नात सेलिब्रिटींची हजेरी
पूजा-सावंतच्या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. सध्या कलाविश्वासह चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पूजा-सिद्धेशच्या लग्नात अभिजीत व सुखदा खांडकेकर, प्रार्थना बेहेरे व तिचा पती अभिषेक जावकर, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकरसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) बरोबरही जोडलं गेलं होतं. पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. अभिनय आणि नृत्यासह आपल्या सौंदर्याने पूजाने सर्वांना वेड लावलं आहे. आता अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.