Navratri 2024 Travel : अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो..प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो... नवरात्रीत देवीच्या आरतीतील हे बोल सर्वांनाच माहित असावे, त्याचप्रमाणे देवीच्या आगमनालाही अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यंदा शारदीय नवरात्र 3 ऑक्टोबरपासून सुरू होतेय. मातेच्या स्वागतासाठी अवघा देश सज्ज झाला आहे. कुठे जागरण-गोंधळ, कुठे देवीच्या नावाचा जयघोष असे उत्साहपूर्ण वातावरण ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नवरात्रीनिमित्त देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. तर काही जण नवरात्री निमित्त देवीच्या खास मंदिरांना भेट देतात. आज आम्ही तुम्हाला देवीच्या एका मंदिराविषयी सांगणार आहोत, जिथे मातेच्या मूर्तीला चक्क घाम येतो. नवरात्रीच्या या उत्सवात तुम्ही या मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता. नऊ दिवस चालणाऱ्या मातेच्या उत्सवात येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. भारतातील अनोख्या मंदिराबद्दल एकदा जाणून घ्या..


 


जिथे देवीच्या मूर्तीला घाम येतो..!


देशभरातील मातेच्या अनेक अद्भुत मंदिरांबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. पण आजच्या लेखात आम्ही तुम्हाला देवीच्या एका मंदिराविषयी सांगणार आहोत, जिथे मातेच्या मूर्तीला घाम येतो. मातेच्या मूर्तीला घाम फुटला की, भक्त ते सौभाग्याचे प्रतीक मानतात. देवीचे हे मंदिर हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात आहे. हे मंदिर शक्तीपीठ भाले माता या नावाने प्रसिद्ध आहे. देवीच्या दर्शनासाठी येथे दररोज हजारो भाविक येतात, मात्र नवरात्रोत्सवात येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.


 




भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी, भाविकांची श्रद्धा


येथे येणारे भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरात येतात. या मातेच्या मंदिरात मूर्तीला घाम फुटतो असे म्हणतात. लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा जेव्हा मातेला घाम येतो तेव्हा मंदिरात उपस्थित असलेल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. मंदिराचे पुजारी सांगतात की, या गावात देवी मातेचे दर्शन झाले होते, त्यामुळे देवीचे मंदिर येथे बांधण्यात आले आहे.


 





मंदिरात कसे जायचे?


हिमाचल प्रदेशातील भाले हे गाव डलहौसीपासून 35 किमी अंतरावर आहे. गावाच्या नावावरून मंदिराचे नावही ओळखले जाते. तुम्ही येथे विमानाने देखील येऊ शकता. दिल्लीहून तुम्हाला डलहौसीसाठी फ्लाइट मिळेल, त्यानंतर तुम्हाला कॅब किंवा बसने येथे जावे लागेल. जर तुम्ही इथे ट्रेनने येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला दिल्लीहून पठाणकोटला जावे लागेल. डलहौसी पठाणकोटपासून 82 किलोमीटर अंतरावर आहे.


 


हेही वाचा>>>


Travel : जिथे पांडवांची सर्व पापं नष्ट झाली, एक प्राचीन शिव मंदिर! रंजक आख्यायिका जाणून व्हाल थक्क, ऑक्टोबरमध्ये करा प्लॅन!


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )