जळगाव : शहरातील एका अंगणवाडीच्या पोषण आहारात (Poshan Aahar) आळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. हरी विठ्ठल नगर भागात असणाऱ्या अंगणवाडीत ही घटना घडली असून यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर अंगणवाडी सेविकांना वारंवार सूचना दिल्या जातात. या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांकडे असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव (Jalgaon News) शहरात हरिविठ्ठल नगरात बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडी क्रमांक ६१ मध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत आळ्या आढळल्या. प्रकल्प अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. शिवाय, पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.
खिचडीत आढळल्या आळ्या
बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत हरिविठ्ठल नगरात अंगणवाडी (क्र.६१) चालवली जाते. या अंगणवाडीत 50 बालके व बालिका येतात. बालकांसाठी श्री सद्गुरू महिला बचत गटाकडून आहार पुरवण्यात येतो. सकाळी अंगणवाडीतील बालकांना डब्यात पोषण आहारातील खिचडी देण्यात आली. कनिष्का बोरसे या मुलीच्या खिचडीत आळ्या आढळून आल्या आहेत. पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केलाय.
काय म्हणाले जिल्हाधिकारी?
अंगणवाडीमध्ये तयार होणाऱ्या आहारासंदर्भात काळजी घेण्याचे सूचना या आयुक्तांकडून प्राप्त होत असतात. त्यासाठी जिल्हास्तरावर एक समिती देखील तयार करण्यात आली आहे. जर अशा पद्धतीने आहारात काही सापडलं तर त्याची पूर्ण बॅच नष्ट करत असतो. तसेच याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देखील अंगणवाडी सेविकांना वारंवार दिलेल्या असतात. त्यामुळे आजपर्यंत बालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास या आहारापासून झालेला नाही. यासंदर्भात कारवाई करण्याचा अधिकार आयुक्त कार्यालयाला आहे आणि या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अंगणवाडीतील खिचडीत आढळला मेलेला बेडूक, पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का?