Korean Skin Care Routine : तजेलदार आणि चमकदार त्वचा मिळवणं हे प्रत्येकाच स्वप्न असतं. पावसाळ्याच्या काळात मात्र त्वचा निस्तेज दिसू लागते आणि त्वचेच्या समस्या देखील उद्भवू लागतात. या काळात त्वचा निस्तेज दिसू लागते. हवेतील आर्द्रतेमुळे त्वचा कधी तेलकट होते, तर कधी कोरडी पडते. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास पद्धतींचा वापर करणे आवश्यक असते.


निरोगी त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी बाजारात मिळणारे महागडी उत्पादने विकत घेण्याची गरज नसते. अशावेळी आपल्याला आपल्या स्वयंपाक घरातील काही नैसर्गिक घटकांची आवश्यकता असते. चला तर मग जाणून घेऊया की, किचनमध्ये असलेल्या गोष्टींचा वापर करून चमकदार ‘कोरियन ग्लास स्किन’ कशी मिळवता येईल...


शुगर स्क्रब


शुगर स्क्रब अर्थात साखरेचा स्क्रब हा त्वचेला एक्सफोलिएट करण्याचा सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे. 10 मिनिटांचा शुगर स्क्रब मृत त्वचा काढून टाकून, रक्ताभिसरण वाढवण्यात मदत करतो. घरच्या घरी शुगर स्क्रब बनवण्यासाठी आपल्याला केवळ साखरेची गरज आहे. अर्धा चमचा खोबरेल तेलात एक चमचा साखर चांगली मिसळा आणि त्याने त्वचेला स्क्रब करा. साखरेसोबत असलेले नारळाचे तेल त्वचेला मॉइश्चराइझ करून, त्वचेचा ग्लो कायम ठेवण्याचे काम करते.


तांदळाचे पाणी


त्वचा चमकदार ठेवण्यासाठीचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावणे. तांदळाचे पाणी अतिनील किरणांमुळे होणारे त्वचेचे नुकसान दूर करण्यास मदत करते. तांदळाचे पाणी कोलेजनच्या निर्मितीसाठी देखील उपयुक्त आहे, ज्यामुळे तुमची त्वचा काचेसारखी बनते. तांदळाचे पाणी बनवण्यासाठी तांदूळ पाण्यात उकळून ते पाणी गाळून एका स्प्रे बाटलीत भरून ठेवावे. 2-3 दिवसांनी या पाण्याचा वापर करावा.


मध


मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे केवळ त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करत नाहीत, तर त्वचा दीर्घ काळ चमकदार ठेवण्यासही मदत करतात. मधात इतरही अनेक पोषक घटक आढळतात. त्वचेवर लावण्यासाठी केवळ सेंद्रिय आणि शुद्ध मधाचाच वापर करावा.


व्हिटॅमिन सी आणि ई सीरम


ज्याप्रमाणे शरीराला जीवनसत्त्वांची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या त्वचेलाही जीवनसत्त्वांची गरज असते. यासाठी आपण व्हिटॅमिन कॅप्सूलचे सेवन करू शकता किंवा व्हिटॅमिन सीरम थेट त्वचेवर लावू शकता. दररोज सकाळी थंड पाण्याने स्वच्छ केल्यानंतर सीरम लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा अधिक घट्ट होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :