Hingoli News: हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे एका वृद्ध व्यक्तीला रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहे. दरम्यान पिंपरी खुर्द गावाला जोडणाऱ्या पुलावरून सुद्धा पाणी वाहत असल्याने आजारी वृद्ध व्यक्तीला कापडाच्या झोळीत बसवून शेतातून रस्ता तुडवत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र ग्रामस्थांचे प्रयत्न असफल ठरले आणि या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. संभाजी माधवराव धांडे (वय 75) असे मृताचे नाव आहे. 


कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील संभाजी धांडे यांची तेब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्याचा त्यांच्या नातेवाईकांनी ठरवले. मात्र सकाळपासून सुरु असलेली रिमझिम आणि त्यातच गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याचे चित्र होते. पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यातच संभाजी धांडे यांची तब्येत खालावत असल्याने घरच्यांनी ग्रामस्थाच्या मदतीने एका लाकडी बल्लीला कापड बांधत झोका बनवला आणि त्यातून संभाजी धांडे यांना रुग्णालयात नेण्याचे ठरवले. 


 ग्रामस्थांचे प्रयत्न असफल ठरले...


पुलावरून पाणी वाहत असल्याने बनवलेल्या झोक्यात संभाजी धांडे यांना बसवत ग्रामस्थांनी शेतातून मार्ग काढला. पावसामुळे शेतात प्रचंड चिखल असतांना पायाखाली चिखल तुडवत गावकऱ्यांनी मार्ग काढला. तब्बल अर्धा किलोमीटर चालत संभाजी धांडे यांना आखाडा बाळापुर येतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संभाजी धांडे यांचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे केवळ रस्ता नसल्याने संभाजीराव धाडे यांना तातडीने आरोग्यसेवा मिळाले नाही. यामुळे त्यांचा  मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 


Maharashtra Rain Live Updates : राज्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, पाहा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट एका क्लिकवर


हिंगोली जिल्ह्यात बिकट परिस्थिती...


गेल्या आठवड्याभरापासून हिंगोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या चोवीस तासात हिंगोली जिल्ह्यात 39.20 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आला आहे. अनेक गावातील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. अशात नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.