Health Tips : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तसेच स्पर्धात्मक जगाकडे पाहताना अनेकदा तब्येतीकडे सहजपणे दुर्लक्ष केलं जातं. यामुळे अनेकजण नैराश्य, मानसिक तणावाचे बळी पडतात. अर्थात कामाचा ताण कितीही असो, नैराश्याची अनेक कारणं जरी असली तरी मात्र त्यावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला नैराश्यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडाफार बदल केला पाहिजे. काही गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे ज्यामुळे तुम्हाला नैराश्यापासून आराम मिळेल. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही सोप्या गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही नैराश्य दूर करू शकता.


सकाळी लवकर उठणे : जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर नैराश्याला सामोरे जाण्याचा हा एक चांगला मार्ग असू शकतो. यातून जास्त ऊर्जा मिळते आणि मूडही चांगला राहतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठण्याची वेळ निश्चित असेल तर शरीराचं रुटीन चांगलं काम करतं आणि झोपही पूर्ण होते. यामुळे नैराश्य दूर होते.


वेळेवर दात घासा : अनेकदा मानसिक तणावात, नैराश्यात असलेले लोक सकाळी लवकर तर उठतात पण वेळेवर दात घासत नाहीत. दात घासणं हा येणाऱ्या दिवसासाठी स्वत:ला तयार करण्याचा, शरीराला सकारात्मक ऊर्जा देण्याचा एक भाग आहे. त्यामुळे ज्या लोकांचे मानसिक आरोग्य चांगले असते ते नेहमी वेळेत उठतात आणि वेळेत फ्रेश होतात. यामुळे नैराश्य दूर करण्यास मदत होते. 


सकाळचं कोवळं ऊन घ्या : सकाळचा सूर्यप्रकाश नैराश्य दूर करण्यास मदत करतो. खरं तर, सूर्यप्रकाशामुळे मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढते, ज्यामुळे मूड चांगला राहतो. म्हणूनच सकाळी लवकर किमान 15 मिनिटे उन्हात बसा.


श्वासोच्छवासाचा व्यायाम करा : आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही सकाळी काही श्वासोच्छवासाचे व्यायाम केले तर ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्यास मदत करतात. केवळ काही मिनिटांच्या सरावामुळे नैराश्य, तणाव यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.


दररोज व्यायाम करा : शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूतील ऑक्सिजनची पातळी देखील वाढते. यामुळे मन शांत राहते आणि आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात, जे आनंदी राहण्यासाठी आणि नैराश्याला सामोरे जाण्यासाठी शक्ती देतात. म्हणूनच रोज सकाळी योगा, व्यायाम करायला हवा.


संतुलित नाश्ता करा : जर तुमचा नाश्ता संतुलित असेल तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. म्हणूनच नाश्ता संतुलित ठेवा यामुळे नकारात्मक विचार कमी होतात.
 
स्वतःला प्रेरित करा : जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा स्वतःला मोटिव्हेट करा की तुम्ही सक्षम आहात, अशा विचारांनी दिवसाची सुरुवात केली तर नकारात्मक विचार तुमच्या मनात येणार नाहीत. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : पोटाची चरबीही कमी होईल आणि पचनक्रियाही नीट राहील; सकाळी उठल्याबरोबर ही 3 आसनं करा