Health: महिलांमध्ये साधारणत: चाळीशीनंतर येणारी रजोनिवृत्ती (मेनोपॉझ) हा फार महत्वाचा टप्पा असतो. या काळात महिलांना अनेक छोट्या मोठ्या शारिरीक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं. या काळात हृदयविकाराचा धोका  अधिक असल्याचं सांगितलं जातं.  पाळी बंद झाल्यानंतर पुढील १० वर्ष महिलांना हृदयविकाराचा धोका असतो. त्यामुळंच या काळात हृदयाची तसेच एकूणच आरोग्याची नीट काळजी घेणं गरजेचंय. याबाबत आपल्या डॉक्टरांशी बोलून काही पथ्य, नियम पाळणं फार महत्वाचं आहे.


मेनोपॉजमुळे हृदयावर काय परिणाम होतो?


चाळीशीतल्या किंवा त्यापुढच्या महिलांना मेनोपॉजची लक्षणं दिसायला लागतात. वयाच्या पन्नाशीपर्यंत पाळी जाते. तज्ञ सांगतात अंडाशयाची क्षमता कमी झाल्यानं पाळी थांबते. पण जशी पाळी येताना मुलींच्या शरीरात बदल होतात. तसेच ती जातानाही काही बदल होतात.  इस्टोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही दोन  संप्रेरकं शरीरात स्त्रवणं बंद होतं. यानंतर महिलांमध्ये अनेक गोष्टी बदलतात. महिलांचं आरोग्य जपणारे हॉर्मोन्स निर्माण होणं थांबू लागलं किंवा या हार्मोन्सचं स्रवणं बंद झालं तर महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो.


मेनोपॉजमध्ये टोकाचे मूडस्विंग


इस्ट्रोजन कमी झालं की रक्तवाहिन्यांच्या आतला स्तर पातळ होतो. तसेच रक्तातील चरबीचं प्रमाण वाढतं. आणि यामुळे रक्तदाब वाढणं, कोलेस्टॉल आणि रक्तातील स्निद्ध घटकांचं प्रमाण वाढलं की त्याचा परिणाम हृदयावर होतो. हेच हार्ट अटॅक येण्यालाही कारणीभूत ठरू शकतं.


मेनोपॉजच्या काळात महिलांना कोणतंही काम करण्याचा त्राण राहत नाही. सतत चीडचीड होणं, कधीकधी अतिउत्साह तर कधी एका जागी तासनतास बसून राहणं, टोकाचे मूडस्विंग अशा कितीतरी बदलांना सामोरं जावं लागतं. या काळात एका जागी बसून राहणं धोक्याचं असल्याचं डॉक्टर सांगतात. मेनोपॉजमध्ये हार्टअटॅक टाळण्यासाठी करायचं काय? मेनोपॉजमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अशावेळी हृदयाची कशी काळजी घ्यायची? तज्ञ सांगतात...


खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं


मासिक पाळी बंद होताना किंवा बंद झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं अतिशय गरजेचं आहे.. आहार तज्ञ सांगतात, आहारात तंतूमय घटक असलेल्या भाज्या, फळे यांसह फोलेटयुक्त अन्न घटकांचा समावेश असणं गरजेचं आहे. हार्ट अटॅकपासून सुरक्षा करण्यासाठी कमी फॅट असणारे अन्न खाण्याबरोबर तज्ञांच्या सल्ल्यानं योग्य डाएट करण्याची गरज आहे.


नियमित व्यायाम आवश्यक


शारिरीक हलचाली कमी असणं, लठ्ठपणा हे हार्ट अटॅकचं मुख्य कारण सांगण्यात येतं. रजोनिवृत्तीनंतर महिलांनी शारिरीक हलचाली करणं आवश्यक असून दररोज किमान अर्धा तास चाललं तरी पाहिजे असं तज्ञ सांगतात. शारिरीक हलचाली कमी असतील तर रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढत असल्याचं तज्ञ सांगतात.


मानसिक स्थिती नीट ठेवण्यासाठी करा मेडीटेशन


अचानक होणारे मूडस्विंग आणि रजोनिवृत्तीमुळे होणारे मानसिक परिणाम लक्षात घेत रोज काही मिनिटे प्राणायाम किंवा मेडीटेशन करण्याचा सल्ला दिला जातो.  मेनोपॉजनंतर शरिरात बदल होतात. त्याचा मनावरही परिणाम होतो. सतत भीती वाटणे, ताण येणे यामुळे शरिरात दाह होतो. ध्यानधारणा केल्याने शरिरातील ऑक्सिजन वाढते. परिणामी रक्ताभिसरण योग्य होते.


आरोग्याची नियमित तपासणी आवश्यक


चाळीशीनंतर महिलांनी आरोग्याची नियमित चाचणी करणं अतिशय गरजेचं आहे. मेनोपॉजनंतर हृदयासंबंधित काही चाचण्या तसेच मेमोग्रॅमही करण्याचा सल्ला महिलांना दिला जातो.