नवी दिल्ली: अमेरिकेतल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी जून महिन्यात जगातली सर्वात मोठी फेस ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केली आहे. या शस्त्रक्रियेला तब्बल 56 तासांचा कालवाधी लागला असून, तब्बल 60 डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. विशेष म्हणजे डॉक्टरांनीही यासाठी तब्बल 50 शनिवारांचं प्रशिक्षण घेतलं.


वास्तविक, 2006 मध्ये 21 वर्षीय अॅन्ड्र्यू सॅडनेसने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याचा चेहरा गंभीर जखमी झाला. अॅन्ड्र्यूला आत्महत्येनंतर उपचारासाठी अमेरिकेतल्या मायो क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर काही काळानंतर तो उपचारांना प्रतिसाद देऊ लागला. यानंतर डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. पण काही केल्या उपचारांना गुण येत नव्हता. डॉक्टरांना त्याचा जबडा, नाक आणि दातांना ठिक करण्यात यश येत नव्हतं.

यानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर तो आपल्या घरी परतला. यानंतर 2012 मध्ये मायो क्लिनिकच्या डॉक्टरांनी सॅडनेसला फेस ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला. पण यामध्ये अनेक अडथळे होते, शिवाय अॅन्ड्र्यूच्या जीवालाही धोका होता. पण तरीही अॅन्ड्र्यूने त्यावर सहमती दाखवत, फेस ट्रांसप्लांट करण्याचं ठरवलं.

या सर्वात अवघड शस्त्रक्रियेसाठी 2016 पासून डोनरचा शोध घेण्यात येत होता. पाच महिन्यानंतर अॅन्ड्र्यूला आपल्या चेहऱ्याशी जुळणारा चेहरा मिळाला. 21 वर्षीय केलन रुडी या मृत व्यक्तीचा चेहरा अॅन्डीशी मिळता जुळता होता. डॉक्टरांनी केलनच्या पत्नीच्या संमतीने हा चेहरा बदलण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेला तब्बल 56 तास लागले. तसेच 60 डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांनीही जवळपास 50 शनिवारांचं प्रशिक्षण घेतलं.

या शस्त्रक्रियेतून अॅन्ड्र्यूला पूर्ण बरं व्हायला त्याला तीन महिन्यांचा काळ लागला. आता त्याची श्वसनाची तसेच जबडा व्यवस्थित काम करत असून, आता तो सर्व सामान्यांमध्ये बिंधास्तपणे वावरु शकतो.

व्हिडिओ पाहा