Mangala Gauri 2022 : आज श्रावणी मंगळवार. श्रावण (Shravan 2022) महिन्यातील मंगळवारला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी मंगळागौरीचा (Mangala Gauri) उत्सव साजरा केला जातो. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेली माहिती जाणून घेऊयात. 


मंगळागौरीची प्रथा : 


श्रावणातील प्रत्येक श्रावणी मंगळवारी परिचितांपैकी कोणाकडे तरी मंगळागौर असतेच. नुकत्याच लग्न झालेल्या मुलीने हे व्रत करावयाचे असते. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी माहेरी आणि नंतरची चार किंवा सहा वर्ष सासरी मंगळागौर जागविली जाते. सोयीनुसार पाच किंवा सात वर्ष हे व्रत केले जाते. ह्या व्रतात सोळा प्रकारची पाने आणि सोळा दिवे पूजेसाठी लागतात. शिवाय पाटा-वरवंटा लागतो.


मंगळागौर पूजेची पद्धत : 


श्रावणातील प्रत्येक श्रावणी मंगळवार सकाळी चौरंगाला चार बाजूंना केळीचे खांब बांधून मखर करावे. ते मखर उपलब्ध होतील त्या पानाफुलांनी सजवावे. नंतर चौरंगावर गौरीच्या मूर्तीची स्थापना करावी. चौरंगाशेजारी पाटा-वरवंटा ठेवावा. व्रतकर्त्या नवविवाहित मुलीने स्नान करून चांगली साडी नेसून अलंकार घालून प्रारभी संकल्प करून मग गौरीची षोडशोपचारी पूजा करावी. यथाविधी पूजा करून मग प्रथम पूजा करणाऱ्या पुरोहितास सौभाग्यवायन दिले जाते. नंतर सोळा वातींच्या दिव्याने किंवा सोळा निरांजने ताटात घेऊन त्यानी देवीची मंगलारती करावी. आरतीनंतर त्या व्रतकर्तीने आणि इतर स्त्रियांनीही हातात अक्षता घेऊन मंगळागौरीची कथा ऐकण्यासाठी बसावे. असा आहे श्रावणी मंगळवार. 


महत्वाच्या बातम्या :