Malavi Mangoes: आंबे म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं.. नाही का..? आंबा हे असं फळ आहे, जे कोणाला आवडत नाही असे शक्यचं नाही. म्हणून आंबे खवय्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आफ्रिकन देश मलावीमधून (Malawi) हापूस आंबा (Alphonso Mango) महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मुंबईतील एपीएमसी बाजार समितीत (Mumbai Agricultural Produce Market Committee) मलावी देशातून या हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. हा आंबा मुंबई, पुणे, अहमादाबाद, राजकोट, दिल्ली आदी शहरांत किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. या आंब्याबद्दल विशेष गोष्ट ती अशी की, मलावी आंब्याचे मूळ देवगड हापूसमध्ये आहे. मग याला आफिक्रेचा मलावा आंबा असं का म्हणतात? जाणून घ्या...
महाराष्ट्र-गुजरातमध्ये या आंब्याला मोठी मागणी
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावीच्या आंब्याला मोठी मागणी आहे. गेल्या पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे. आफ्रिकेतील मलावी देशातून आलेला हा हापूस आंबा तसेच दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टॉमी अटकिन्स जातीचे आंबे आता मुंबईत दाखल झाले आहेत. डिसेंबरअखेर या विशेष जातीच्या आंब्यांची आयात सुरू राहणार आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, राजकोट आणि दिल्लीत किरकोळ विक्रीसाठी आंबे उपलब्ध असणार आहेत.
यंदा मलावी आंब्याचा हंगाम लांबला?
मलावी देशातील हापूस आंब्याला भारतातही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. दरवर्षी हा आंबा देशाच्या बाजारपेठेत दाखल होतो. यावर्षी देखील मलावीमधून हापूस आंबा मुंबईच्या एपीएमसी बाजार समितीत दाखल झाला आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मालावी हापूस मुंबईत दाखल होत असतो. यंदा मलावीत आंब्याचा हंगाम लांबला आहे, शिवाय उत्पादनातही घट झालेली आहे. त्यामुळे मलावी हापूसची आयात तीन आठवडे उशिराने झाली आहे. आता डिसेंबरपर्यंत नियमित आवक होत राहील. दर आठवड्याला सुमारे सात हजार बॉक्सची आवक होण्याची शक्यता आहे.
आफ्रिकेचा मलावा आंबा मूळ कोकणातला?
या मलावी आंब्याबद्दल सांगायचं म्हणजे, स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, हा आंब्याचा थेट संबंध कोकणच्या मातीशी आहे, माहितीनुसार, या मलावी आंब्याचे मूळ देवगड हापूसमध्ये आहे. साधारण बारा वर्षांपूर्वी हापूस आंब्याच्या कलम करण्यायोग्य लहान फांद्या रत्नागिरीतून मलावी देशात पाठवण्यात आल्या होत्या. त्यांची कलमे करून आफ्रिकेत सुमारे 26 एकर शेतात लागवड करण्यात आली होती. पुढे क्षेत्रवाढ होऊन मलावी देशात सुमारे हजार हेक्टरवर आंबा लागवड झाल्याचे सांगण्यात येते. या आंब्याला मलावी हापूस म्हटले जाते. 2018 मध्ये आफ्रिकेतील हे मलावी हापूस आंबे पहिल्यांदा वाशी बाजार समितीत आले होते. त्यानंतर मलावी हापूस आंब्यांची आवक होत राहते.
मलावी आंब्याचा भाव काय?
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे. या आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच असल्यानं या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या आंब्याला एक किलोला हजार ते दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे. तर मलावी आंब्याच्या तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन ते पाच हजार रुपयापर्यंत आहे. दर्जानिहाय मालावी हापूसला प्रती बॉक्स तीन हजार ते पाच हजार रुपये आणि टॉमी अटकिन्स प्रती बॉक्स तीन हजार रुपये दराने किरकोळ बाजारात विक्री होण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा>>>
Travel: 'रेल्वेचं 'तत्काळ' तिकीट बुक करण्यात अडचण येतेय? 'या' प्रो टिप्स ठरतील उपयुक्त, लगेच जाणून घ्या..