Makar Sankranti 2024 : भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत (Makar Sankranti 2024) हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या महिन्यात येणारा शेतीप्रधान सण आहे. या सणाचा सौर कालगणनेशीही संबंध आहे. मकर संक्रांत म्हटलं की, आपल्याला आठवतात ते तीळ गुळाचे लाडू. हा सण जवळ आला की, प्रत्येकाच्या घरात तीळ गुळाचे विविध प्रकारचे पदार्थ बनवायला सुरुवात होते. तसेच, मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे. या सणाची चाहूल लागताच आकाशात रंगीबेरंगी पतंग आपल्याला पाहायला मिळतात.
संक्रांत का साजरी केली जाते?
सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला जोतिषशास्त्रात संक्रांत असे म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या पवित्र मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो अशी मान्यता आहे. एका संक्रांतीतून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा काळ हा सौर मास (महिना) म्हणून ओळखला जातो. पौष महिन्यात सूर्याचे उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते. मकर संक्रांत हा सण उत्तर भारतात दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण, या वर्षी मकर संक्रांत ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की मकर संक्रांतीला स्वर्गाचे दार उघडते. काय आहे या मागचे रहस्य असं नेमकं का म्हणतात जाणून घेऊयात.
मकर संक्रांतीला स्वर्गाचे दार उघडते
अशी मान्यता आहे की, संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसाची सुरुवात होते. अशी हिंदू धर्माची मान्यता आहे. तसेच, धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. म्हणून या दिवशी केलेले पुण्य आणि दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि फलदायी मानले जाते.
मकर संक्रांतीला काय दान करावे?
मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल यांचे दान केल्यास मोक्षप्राप्ती मिळते. अशी मान्यता आहे.
महाभारत आणि मकर संक्रांतीचा काय संबंध आहे?
महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता. गीतेत असे सांगितले आहे की, जो माणूस उत्तर शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतो. म्हणून हा दिवस लोक आनंदात आणि मोठ्या उत्सहात साजरी करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :