Lifestyle : असं म्हणतात ना की, मृत्यू कोणाच्याच हातात नाही, हा निसर्गाचा नियम आहे, ज्याचा जन्म झाला, त्याचा मृत्यूही अटळ आहे. पण तुम्हाला माहित आहे का? गेल्या काही दशकांमध्ये विज्ञानाची प्रगती इतकी झपाट्याने झाली आहे की, येत्या काही वर्षांत मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करण्याचे तंत्रज्ञानही शोधले जाईल, असा अंदाजही बांधला जाऊ लागला आहे. हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल, पण Cryopreservation एक असं तंत्रज्ञान आहे, ज्याच्या माध्यमातून व्यक्ती मृत्यूनंतर ते भविष्यात पुन्हा जिवंत होऊ शकतो, असं सांगण्यात येतंय. नेमकं काय आहे हे तंत्र? जाणून घ्या..


 


अमेरिकेतील अब्जाधीशांनी क्रायोप्रिझर्वेशन तंत्र अवलंबण्यास सुरुवात केली


विज्ञानाची प्रगती इतकी झपाट्याने होत आहे की, आता लोकांचीही ही देखील इच्छा आहे की, मृत्यूनंतर ते भविष्यात पुन्हा जिवंत व्हावेत. आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक आता त्यांचे मृतदेह Cryopreservation तंत्रज्ञानाने साठवून म्हणजेच फ्रीज करून ठेवत आहेत, येत्या काही वर्षांत मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करण्याचे तंत्रज्ञानही शोधले जाईल, असा अंदाज बांधला जाऊ लागला आहे. आता हे कधी होईल आणि ते होईल की नाही? याबद्दल काहीही सांगता येत नाही, परंतु या अनुमानांच्या आधारे अमेरिकेतील अब्जाधीशांनी क्रायोप्रिझर्वेशन नावाचे तंत्र अवलंबण्यास सुरुवात केली आहे. हे एक अतिशय प्रगत तंत्रज्ञान आहे आणि खूप मनोरंजक देखील आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.


 


क्रायोप्रिझर्वेशन म्हणजे काय?


क्रायोप्रिझर्वेशनमध्ये, शरीर सडण्यापासून रोखण्यासाठी, अशा स्थितीत आणले जाते, ज्यामध्ये सर्व जैविक क्रिया थांबतात. यानंतर, शरीराचे विट्रिफिकेशन केले जाते, ज्यामध्ये शरीरात असलेल्या रक्ताच्या जागी एक विशेष प्रकारचे सोल्युशन सोडले जाते. हे मृत व्यक्तीच्या शरीरात बर्फाचे स्फटिक तयार होण्यापासून रोखण्यासाठी केले जाते. बर्फ गोठल्यामुळे शरीराच्या पेशी आणि ऊतींचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे केले जात आहे. विट्रिफिकेशननंतर, शरीराला -196 अंश तापमानात नेले जाते आणि नंतर लिक्विड नायट्रोजनने भरलेल्या व्हॅक्यूम इन्सुलेटेड कंटेनरमध्ये साठवले जाते.



आतापर्यंत 500 लोकांचे शरीर स्टोअर्स झाले 


क्रायोप्रिझर्वेशन हे एक तंत्र आहे, ज्यामध्ये मृतदेह खराब होण्यापासून रोखण्यासाठी खूप कमी तापमानात बराच काळ ठेवला जाते. एका अहवालानुसार, या तंत्राद्वारे आतापर्यंत 500 लोकांचे शरीर सुरक्षित झाले आहे. यातील बहुतांश लोक अमेरिकेतील आहेत. भविष्यात संशोधक असे शोध लावतील की, मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होतील या आशेने हे तंत्रज्ञान अवलंबले जात आहे आणि या इच्छेने हे सर्व लोक त्यांचे शरीर जतन करून घेत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, जगभरात सुमारे 5500 लोक क्रायोप्रिझर्वेशनचा अवलंब करण्याचा विचार करत आहेत. मिळालेल्या माहितनुसार, हे तंत्रज्ञान खूप महाग आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हे करणे शक्य नाही आणि केवळ अब्जाधीशच ते स्वीकारत आहेत.


 


फक्त मेंदू जपण्यासाठी 66 लाख रुपये


कोणत्याही मृत शरीराला क्रायोप्रिझर्व्ह करणे इतके महागडे आहे की, फक्त मेंदू जपण्यासाठी 66 लाख रुपये आणि संपूर्ण शरीर जपण्यासाठी सुमारे 1 कोटी 66 लाख रुपये खर्च येतो. हा शुल्क अमेरिकेच्या अल्कोर लाइफ एक्स्टेंशन फाउंडेशनचा आहे, जो एक पुनरुज्जीवन ट्रस्ट देखील चालवतो. ज्यांना पुन्हा जिवंत व्हायचे आहे, त्यांच्या पैशाचे व्यवस्थापन करणे हे या ट्रस्टचे काम आहे. या पैशातून जतन केलेल्या शरीराची काळजी घेतली जाते. एवढेच नाही तर त्या व्यक्तीचे पुनरुज्जीवन झाल्यावर त्याला काही पैसेही दिले जातील, असेही बोलले जात आहे.


 


हेही वाचा>>>


Health : नॉन-स्टिक भांड्यांत अन्न शिजवत असाल तर आताच सावध व्हा, अत्यंत धोकादायक! कर्करोगासह इतर आजार होऊ शकतात.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )