Lakshmi Pujan Diwali 2022 : दिवाळी (Diwali 2022) लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) ही भारतीय संस्कृतीतील महत्वाची पूजा मानली जाते. लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा दरवर्षी प्रथेप्रमाणे केली जाते. यावर्षी लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबर रोजी साजरे केले जाणार आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष चोपडी पूजन देखील करतात. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. 


लक्ष्मीपूजनाची विधी :


लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी हे आपली चोपडी पूजन करुन आपल्या व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. त्यासाठी ते नव्या वहीची (चोपडी) विधीवत पूजा करतात. यालाच चोपडी पूजन असं म्हटलं जातं. यावेळी घरोघरी लक्ष्मीचं देखील पूजन केलं जातं. घरातील पैसे, सोने-नाणे हे देवीच्या फोटोसमोर मांडून त्याची पूजा केली जाते. या दिवशी अंगाला उटणे लावून आंघोळ करतात. या दिवशी लक्ष्मीची यथासांग पूजा करून, घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्तास्यांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते.


लक्ष्मीपूजनाची परंपरा :


अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. केरसुणीने घर स्वच्छ होऊन घरातील दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.


प्राचीन काळची प्रथा :


प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले.


लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी आणि नीती ' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला 'मांडणे' असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.


महत्वाच्या बातम्या :