Kojagiri Purnima : अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' (Kojagiri Paurnima 2022) असे म्हणतात. शरद ऋतूमध्ये येणारी पौर्णिमा म्हणून या पौर्णिमेला 'शरद पौर्णिमा' (Sharad Purnima) असंही म्हटलं जातं. नवरात्री आणि दसरा संपला की अवघ्या काही दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा येते. संपूर्ण भारतात कोजागिरी पौर्णिमा वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. मात्र कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामध्ये एक साम्य आढळलं ते म्हणजे मसाला दूध किंवा खीर. आपणही कोजागिरी पौर्णिमा हा शब्द ऐकला की, आपल्यालाही पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे मसाला दूध. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, कोजागिरीला मसाला दूधचं का पितात, इतर काही का नाही. याचं कारण जर तुम्हालाही माहित नसेल, तर ते जाणून घ्या.


हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व


आज कोजागिरी पौर्णिमा आहे. हिंदू धर्मात आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, पुरातन काळात आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याचं म्हटलं जातं. याच दिवशी समुद्र मंथनातून पृथ्वीवर देवी प्रकट झाली, त्यामुळे या दिवशी श्री लक्ष्मी मातेची पूजा करण्याची प्रथा आहे. तर दुसऱ्या कथेनुसार, या दिवशी वृंदावनात श्रीकृष्ण भगवान यांनी राधा आणि इतर गोपिकांसोबत रासलीला केली होती. त्यामुळे यादिवशी रासगरबाही खेळला जातो. 


कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध पिण्यामागचं कारण?


महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करण्यामागचं कारण काय आहे ते जाणून घ्या. कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते. यावेळी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते. वातावरणात बदल होतं असतात. अशावेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते. ही ताकद म्हणजे कॅल्शिअम आपल्याचा दुधातून मिळते. यामुळे फार पूर्वीपासून आयुर्वेदानुसार, कोजागिरी पौर्णिमेला दुध किंवा दूग्धजन्य पदार्थांचं सेवन करण्याची पद्धत आहे. याशिवाय दुधात ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, दालचिनी, चारोळी असे पदार्थ मिसळल्याचे दुधाचे औषधी गुण अधिक वाढतात. हे आरोग्यासाठी अतिशय लाभदाक असतं. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध, खीर किंवा दूग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात.


चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवण्याचं कारण


आयुर्वेदानुसार, चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. चंद्रप्रकाशात दूध प्यायल्याने आपल्या शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा, यासाठी चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून नंतर याचं सेवन केलं जातं.