मुंबई : International Nurse Day रुग्णांच्या सेवेचा पाया रचणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन म्हणजेच 12 मे इंटरनॅशनल नर्स डे. आजचा दिवस जगभरात ‘नर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. फ्लॉरेन्स नाइटिंगेल या 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी केली होती. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. त्यांचे हे कार्य लक्षात घेऊन त्यांचा जन्मदिन जागतिक परिचारिका दिन (International Nurse Day) म्हणून साजरा करण्यात येतो.


जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. एकट्या भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 70 हजारांच्या पार गेला आहे. तर 22 हजार 454 रुग्ण बरे झाले आहेत. या महामारीच्या काळात सर्वचं अत्यावश्यक सेवांचा कस लागतो आहे. मात्र मुख्यत: कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या परिचारिका महत्वाची भूमिका पार पाडत आहे. राज्यात अशा संकटाच्या परिस्थितीत राजकारण तसेच इतर ठिकाणी कार्यरत आहेत पण मूळ वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या महिलांनी परिचारिका म्हणून काम करण्यात पुन्हा सुरुवात केली आहे. यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे  या महिलांनी आपल्या रुग्णसेवेचा वसा पुन्हा स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. याच महिलांविषयी थोडक्यात

किशोरी पेडणेकर (मुंबई महापौर)

कोरानच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी तब्बल 19 वर्षानंतर परिचारिकेचा गणवेश परिधान केला. मुंबईतील नायर रुग्णालयात परिचारिका म्ह्णून काम करण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी एक पाऊल टाकलं.

राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी किशोरी पेडणेकर यांनी अनेक वर्ष नर्सिंग क्षेत्रात परिचारिका म्हणून रुग्णांची शुश्रुषा करण्याचं काम केलं आहे. त्यांना नर्सिंग क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव आहे. त्यात आज त्यांनी रुग्णालयात गणवेशात जाऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचं मनोधैर्य वाढवलं. तसेच संकटाच्या काळात केवळ पदं मिरवत बसण्याऐवजी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या कामात हातभार लावणे आपले उद्दिष्ट असल्याचं पेडणेकर यांनी सांगितले.



विनिता राणे (कल्याण डोंबिवली महापौर)

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी त्यांची परिचारिकेची भूमिका  पुन्हा एकदा पार पाडली. कोरोना रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि परिचारिका अन्य स्टाफचे मनोबल वाढण्यास अधिक मदत झाली.

महापौर राणे या मुंबईतील नायर रुग्णालयत नर्स होत्या. 1983 ते 2015 पर्यंत विनिता यांनी नायर हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम केलं. 32 वर्षे त्यांनी त्याठिकाणी नर्सचे काम केले. रुग्णांची सेवा करण्याच्या कामात विशेष आनंद होता. त्यानंतर त्या राजकारणाकडे वळल्या. राजकारणात आल्यावर त्या कल्याण डोंबिवलीच्या महापौर झाल्या. त्यांनी नर्सचे काम बंद केले होते.