मुंबई : कोरोनापाठोपाठ मोठं संकट मुंबईच्या उंबरठ्यावर आहे ते म्हणजे पावसाळ्यातलं संकट. यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबणार का? हा प्रश्न आहे. कारण मुंबई महापालिकेची सगळी यंत्रणा कोरोनाच्या संकटाशी झुंजतेय आणि मुंबईतल्या अत्यावश्यक असणाऱ्या मान्सूनपूर्व कामांचा वेग अत्यंत मंदावला आहे. मुंबईच्या नालेसफाईचं आणि मिठी नदीच्या स्वच्छतेचं लक्ष्य अपूर्ण राहिले आहे. महापालिकेने आतापर्यंत जी मान्सूनपूर्व कामे सुरु केली आहे त्यात प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मिठी नदीतला केवळ 29 टक्के गाळ उपसण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी 70 टक्के गाळ उपसण्याचं काम आवश्यक असते. उरलेले 30 टक्के काम हे पावसाळ्यात आणि त्यानंतर केले जाते.
पावसाळा अवघ्या 15 ते 20 दिवसांवर येऊन ठेपला आहे. एवढ्या कालावधीत राहिलेलं लक्ष्य पूर्ण करणं अवघड आहे. तसंच, राहिलेली नालेसफाई वेगाने करायची म्हटली तरी मुंबईतून कामगारांनी गावाकडची वाट धरली असल्याने नालेसफाईला कामगार आणायचे कुठून हा देखील प्रश्न आहे. नालेसफाईची टेंडर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिली गेली आहेत. मात्र, कंत्राटदारांना कामगारच मिळत नसल्यानेही नालेसफाईची कामं रखडली आहेत.
मुंबई महापालिका क्षेत्रातील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे अशा तिन्ही भागातून सुमारे 21.505 किलोमीटर लांबीचा मिठी नदीचा प्रवाह आहे. कंत्राट कालावधीदरम्यान मिठी नदीमधून सुमारे 1 लाख 38 हजार 830 मेट्रिक टन एवढा गाळ उपसण्याचे लक्ष्य असते. यापैकी 70 टक्के म्हणजे 98 हजार 500 मेट्रिक टन गाळ हा पावसाळापूर्व साफसफाई म्हणून काढला जाणार आहे. या 98 हजार 500 मेट्रिक टन पैकी आतापर्यंत 26 हजार 118 मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे.
तर पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या 29 टक्के काम पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी संपूर्ण उद्दिष्ट गाठले जाईल, अशारितीने कामाला गती दिल्याचं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी सांगितले.
दरम्यान मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सोमवारी (11 मे) नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची प्रत्यक्ष स्थिती पाहण्यासाठी दौरा केला. "पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. लॉकडाऊनच्या अडचणींवर मात करुन आपण कामांना गती देणे गरजेचे आहे. आता आवश्यक असल्यास अधिक संयंत्रे, मनुष्यबळ तैनात करावे. गरज असल्यास दोन सत्रांमध्ये काम पूर्ण करुन गाळ उपसण्याचे उद्दिष्ट नियोजित वेळेत गाठावे," असे निर्देश त्यांनी दिले.