World No Tobacco Day 2024 : धूम्रपान हा आरोग्यासाठी एक मोठा धोका असल्याचं आपण नेहमी एकत आलो आहोत, तसेच याची जाणीवही अनेक वर्षांपासून आहे. धुम्रपान अनेक दीर्घकालीन आजारांसाठी कारणीभूत असते. धुम्रपानामुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांपैकी, हृदयाच्या आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम खूप गंभीर असतात. आज 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे, यानिमित्ताने आपण मुंबई येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिजीत बोरसे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया


धुम्रपानामुळे हृदयाला किती प्रकारे नुकसान होते?


 विविध पातळीवर सार्वजनिक आरोग्य अभियानं राबवून आणि इशारा देऊनही कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांसाठी (सीव्हीडी) कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये धुम्रपान हा एक सर्वात मोठा घटक आहे. या आजारांमध्ये हृदयातील रक्तवाहिन्याचा आजार, हृदय निकामी होणे आणि स्ट्रोक यासारख्या आजारांचा समावेश होतो. धुम्रपानामुळे हृदयाला किती प्रकारे नुकसान होते हे जाणून घेणे आवश्यक आहे, तसेच धुम्रपान प्रतिबंधासाठी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर उपचार करणे देखील महत्त्वाचे आहे.


आरोग्याला हानी पोहोचण्याचे प्रकार


अथेरोस्क्लेरॉसिस : धुम्रपानामुळे अथेरोस्क्लेरॉसिसच्या प्रक्रियेचा वेग वाढतो. यात रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक साचत जातात. त्या निमुळत्या होतात आणि रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. यामुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचा आजार होतो. परिणामी, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. सिगरेटच्या धुरातील रसायने रक्तावाहिन्यांच्या आतील अस्तराचा ऱ्हास होतो आणि प्लाक जमा होण्याची शक्यता वाढते.


रक्ताची गुठळी होणे : सिगरेटमधील निकोटिन आणि इतर रसायनांमुळे रक्त चिकट होते. त्यामुळे गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते आणि गुठळी करणाऱ्या घटकांची पातळी वाढते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक (अडथळा) निर्माण होण्याची जोखीम वाढते. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो.


हृदयाच्या ठोक्यांचा वेग आणि रक्तदाब वाढणे : निकोटिनमुळे ॲड्रेनलिन स्त्रवण्याला चालना मिळून हृदयाच्या ठोक्यांचा वेग लगेच वाढतो आणि रक्तदाबही वाढतो. हृदय व रक्तावाहिन्यांच्या यंत्रणेवर सतत ताण येऊन हायपरटेन्शन (उच्च रक्तदाब) होते. हृदयविकारासाठी हा एक मोठा जोखीम घटक असतो.


ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे : सिगरेटच्या धुरातील कार्बन मोनॉक्साइड रक्तातील हिमोग्लोबिनशीमध्ये मिसळतो आणि त्याची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. याचा अर्थ हा की, शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरविण्यासाठी शरीराला अधिक कष्ट करावे लागतात. परिणामी, हृदयविकारांचा आणि हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो.


 


हृदयावर होणारे दीर्घकालीन परिणाम काय आहेत?


हृदयातील रक्तावाहिन्यांचा विकार (सीएडी) : धुम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेने धुम्रपान करणाऱ्यांना सीएडी होण्याची शक्यता दोन ते चार पटींनी अधिक असते. छातीत दुखणे, हृदयविकाराचा झटका, हृदय बंद पडून अचानक होणारा मृत्यू, असे याचे परिणाम असतात. हा धोका, किती सिगरेट ओढल्या आणि किती वेळ ओढल्या याच्या थेट प्रमाणात असतो. 


हृदय निकामी होणे : दीर्घकालीन धुम्रापानामुले हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते. त्यामुळे हृदय निकामी होते. या आजारात हृदय परिणामकारकपणे रक्ताचे पंपिंग करू शकत नाही. परिणामी, धाप लागणे, थकवा येणे, द्रव-धारण (फ्लुइड रिटेन्शन) इत्यादी परिणाम होतात. हृदय निकामी होण्यासाठी धुम्रपानामुळे झालेले हायपरटेन्शन आणि अथेरोस्क्लेरॉसिस हे महत्त्वाचे घटक आहेत.


स्ट्रोक : धुम्रपानामुळे स्ट्रोकचा धोका दुप्पट वाढतो. अथेरोस्क्लेरॉसिस आणि रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे ही शक्यता अधिक असते. स्ट्रोक आल्यास त्याचे गांभीर्य किंवा मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम झाला आहे यानुसार दीर्घकालीन व्यंग किंवा मृत्यू येऊ शकतो. 


परिफेरल आर्टरी डिसीझ (पीएडी) : धुम्रपानामुळे हृदयाच्या बाहेरील रक्तवाहिन्यांवरही परिणाम होतो. परिणामी पीएडी हा आजार होतो. या आजारात हात आणि पायात वेदना होतात आणि ते बधीर होतात. तसेच संसर्ग व अल्सर होण्याची शक्यता वाढते आणि तो अवयव कापावा लागू शकतो.


 


रिकव्हरी आणि उपचारांवर होणारा परिणाम


ज्या व्यक्तींना हृदयविकार असतो त्यांच्यावर होणारे उपचार आणि रिकव्हरीमध्ये धुम्रपानामुळे गुंतागुंत निर्माण होते. धुम्रपान करणाऱ्या ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येतो, त्यांना दुसरा झटका येण्याची शक्यता अधिक असते आणि धुम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेने त्यातून त्यांचा जीव वाचण्याचा दर कमी असतो. त्याचप्रमाणे धुम्रपानामुळे, हृदयविकारावरील काही औषधांची परिणामकारकता कमी होऊ शकते. त्यामुळे हृदयविकारांवर उपचार करणे कठीण होते.


 


धुम्रपान आताच सोडण्याचा संकल्प चांगल्या आरोग्याकडे नेणारा मार्ग!


धुम्रपान सोडल्याचे परिणाम खूप महत्त्वाचे असतात आणि जवळपास लगेच दिसून येतात. धुम्रपान थांबवल्याच्या २० मिनिटांत हृदयाचे ठोके आणि रक्तदाब कमी होतो. वर्षभरात, हृदयविकार होण्याची शक्यता धुम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेने निम्मी होते. जसजसा काळ पुढे सरकतो, ही जोखीम कमी होत जाते. अर्थात, जे पूर्वी धुम्रपान करत होते त्यांना असलेली जोखीम धुम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेने जास्तच असते. धुम्रपानाचे हृदयाच्या आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम ठळक आणि बहुआयामी असतात. कारण, धुम्रपानामुळे हृदयातील रक्तवाहिन्यांच्या यंत्रणेची रचना आणि कार्यावर परिणाम होतो. सार्वजनिक आरोग्य उपक्रमांनी, हृदयविकाराला प्रतिबंध करण्यासाठी धुम्रपानाला आळा घालण्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. धुम्रपान सोडल्याने, हृदयविकारांचा धोका कमी होतो आणि आयुष्याचा एकूण दर्जा सुधारतो.


 


 


हेही वाचा>>>


World No Tobacco Day 2024 : तंबाखू खाणाऱ्यांनो वेळीच थांबवा! 'हे' जीवघेणे आजार झाल्याचे समजले, तर पायाखालची जमीन सरकेल


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )