World Lung Cancer Day 2024 : आजकाल बदलती जीवनशैली, कामाचा ताण, जंकफूडचे अतिप्रमाणात सेवन या आणि अशा अनेक गोष्टींमुळे अनेक लोकांना  विविध आजारांनी ग्रासलंय. जीवनशैलीत झपाट्याने बदल होत असल्याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसून येतो. कामाचा वाढता ताण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी अनेक समस्या आणि आजारांचे कारण बनतात. फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजेच (Lung Cancer) हा यापैकी एक आजार आहे, ज्याची प्रकरणे सध्या वेगाने वाढत आहेत. हा कर्करोगाचा एक गंभीर प्रकार आहे, जो जगभरात कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. सध्या अनेक लोक या आजाराला बळी पडत आहेत. लंग कॅन्सर म्हणजेच फुफ्फुसाचा कर्करोग दिन दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज आपण धुम्रपान न करणाऱ्यांमध्ये प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग कसा होतो हे जाणून घेणार आहोत.


 


नुकत्याच एका अभ्यासातून खुलासा..


धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो असे सर्वसाधारणपणे मानले जाते आणि हे बऱ्याच अंशी खरे आहे, परंतु काही काळापासून समोर येत असलेल्या आकडेवारीत नवीन चित्र समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतातील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे 50% पेक्षा जास्त रुग्ण हे धूम्रपान न करणारे आहेत. अभ्यासानुसार, धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये या कर्करोगाच्या जोखमीच्या घटकांमध्ये प्रदूषण हे एक प्रमुख घटक आहे.  फुफ्फुसाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे जो जगभरातील अनेक लोकांना प्रभावित करत असल्याचं समोर येतंय. फुफ्फुसाच्या कर्करोग दिनानिमित्त, प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कसा वाढतो हे जाणून घेण्यासाठी एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार डॉ. विकास गोस्वानी यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिलीय.


 


हा कर्करोग होण्याचा धोका कसा वाढतो?


प्रदूषण, विशेषत: वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हवेतील प्रदूषणात नायट्रोजन डायऑक्साइड (NO2), ओझोन (O3) आणि सूक्ष्म कण (PM2.5) हे घटक यासाठी जबाबदार आहेत. या सूक्ष्म कणांमध्ये रक्ताभिसरणात प्रवेश करून फुफ्फुसात खोलवर जाण्याची क्षमता असते. या दूषित घटकांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे फुफ्फुसाच्या पेशींचे नुकसान होऊ शकते आणि जळजळ होऊ शकते. या नुकसानीमुळे, फुफ्फुसाच्या पेशींचा डीएनए बदलू शकतो, ज्यामुळे उत्परिवर्तन होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.


 


या लोकांना धोका अधिक 


याव्यतिरिक्त, बऱ्याच प्रदूषकांमध्ये कर्करोगास कारणीभूत रसायने असतात, जसे की जड धातू आणि पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्स (PAHs), जे थेट कर्करोगाच्या विकासास हातभार लावतात. जे लोक जास्त प्रदूषण असलेल्या भागात राहतात, जसे की गजबजलेले रस्ते किंवा औद्योगिक क्षेत्रे, ते सर्वात असुरक्षित असतात. याव्यतिरिक्त, एस्बेस्टोस, सेकंडहँड स्मोक आणि रेडॉन सारख्या अंतर्गत दूषित घटकांचा देखील मोठा परिणाम होतो.



या मार्गांनी संरक्षण करू शकता


ज्या लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते किंवा ज्यांना आधीच श्वसनाचा त्रास आहे त्यांना जास्त धोका असतो. 
अशा अनेक पद्धती आहेत ज्यांच्या मदतीने प्रदूषणामुळे होणारा फुफ्फुसाचा कर्करोग बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकतो. 
प्रदूषणाविरुद्ध कडक कायदे, स्वच्छ ऊर्जास्रोत आणि उत्तम शहरी नियोजन याद्वारे वायू प्रदूषणाचा धोका कमी करून,
प्रदूषणामुळे होणारा फुफ्फुसाचा कर्करोग बऱ्याच अंशी टाळता येऊ शकतो.


 


 


हेही वाचा>>>


Women Health : महिलांनो हे माहित आहे का? केवळ 'या' एका हार्मोनच्या कमतरतेमुळे वाढतो Bone Cancer चा धोका, 'या' गोष्टींकडे विशेष लक्ष द्या


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )