Diabetes Impact On Kidneys : बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्या विविध आजार लोकांना होत आहेत. त्यामध्ये मधुमेह (Diabetes) आजाराने बाधित असलेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे.  भारतात मधुमेही रूग्णांची (Diabetes Patient) संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेहामुळे शरीरातील अन्य अवयवांसह मूत्रपिंडाच्या (Kidney) कार्यावरही विपरित परिणाम होत आहे. मधुमेही रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्णांमध्ये मूत्रपिंडाचा आजार (Kidney Disease) वाढत असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मूत्रपिंडाचा आजार असलेल्या 80 टक्के रूग्णांना मधुमेह आहे. 


बऱ्याचदा मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होतात. अशा रूग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकच पर्य़ाय असतो. त्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम होऊ नयेत म्हणून रक्तातील साखरेची मात्रा नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. 


भारतात मधुमेह ही एक जागतिक समस्या बनत चालली आहे. हा आजार कुठल्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. मधुमेह या आजाराची लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे डायबिटिक किडनीच्या आजाराची लक्षणे देखील 80 टक्क्यांपर्यंत किडनी खराब होईपर्यंत जाणवून येत नाहीत. 


ही आहेत लक्षणे 


काहीवेळा ते लघवीतील अल्ब्युमिनच्या गळतीमुळे आढळून येते. या आजाराची चाचणी आणि उपचारात विलंब झाल्यास त्याची लक्षणे अधिक गंभीर होऊ शकतात. इतर लक्षणांमध्ये लवकर थकवा येणे, रात्री नेहमीपेक्षा जास्त लघवी होणे, भूक न लागणे, कष्टाची कामे करण्यात अडचण, श्वासोच्छवासाचा त्रास, स्नायू पेटके, पिवळी लघवी यांचा समावेश होतो. वेळीच निदान व उपचार न झाल्यास हदय व रक्तवाहिन्यांचा आजार, स्ट्रोक, न्यूरोपॅथी, सुन्नपणा आणि मुंग्या येणे, दृष्टी समस्या किंवा अगदी अंधत्व येऊ शकते. त्याचप्रमाणे, डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणून ओळखले जाणारे मूत्रपिंडाचे नुकसान ही मधुमेहाची आणखी एक गुंतागुंत आहे. जी अनियंत्रित ग्लुकोजची पातळी मूत्रपिंडातील लहान फिल्टरिंग युनिट्सना हानी पोहोचवते तेव्हा उद्भवते. उपचार न केल्यास हे कालांतराने क्रॉनिक किडनीच्या आजारात वाढू शकतो.


मधुमेह नियंत्रित ठेवणे गरजेचे 


मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील मधुमेह तज्ज्ञ डॉ. भाविक सगलानी यांनी म्हटले की, “मूत्रपिंड निकामी झालेल्यांपैकी 80 टक्के प्रकरणांमध्ये रूग्णांना मधुमेह असतो. अनियंत्रित झाल्याने मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंना नुकसान होऊ शकते. मधुमेहाशी संबंधित रक्तातील ग्लुकोजच्या उच्च पातळीमुळे किडनीतील नाजूक फिल्टरिंग प्रणाली कालांतराने खराब होऊ शकते आणि मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते. दर महिन्याला अनेक मधुमेही रुग्ण उपचारासाठी येतात. यापैकी 25 ते 30 रुग्णांना मधुमेहामुळे मूत्रपिंडाचा त्रास असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. किडनी आजारातील धोका कमी करण्यासाठी जीवनशैलीतील बदल आणि औषधोपचारांद्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य नियंत्रण राखणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. 


झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील मधुमेही तज्ज्ञ डॉ. निता शहा म्हणाल्या की, “डायबेटिक नेफ्रोपॅथी उच्च रक्तदाबाला आमंत्रण देते. मूत्रपिंडाचा आजार जसजसा वाढतो. तसतसे, मूत्रपिंडाच्या संरचनेतील बदलांमुळे रक्तदाब पातळीत वाढ होते. हायपरटेन्शनचे व्यवस्थापन करण्यात अयशस्वी झाल्यामुळे डायबेटिक नेफ्रोपॅथीच्या शेवटच्या टप्प्यात वाढ होऊ शकते. डायबेटिक नेफ्रोपॅथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, लक्षणे दिसू शकत नाहीत. तथापि, स्थिती जसजशी वाढत जाते, तसतसे व्यक्तींना उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात आव्हाने येऊ शकतात. 


मधुमेहामुळे डायलिसिसची येऊ शकते वेळ


पाय, घोटे, हात किंवा डोळे अशा शरीराच्या विविध भागांमध्ये सूज येऊ शकते. इतर लक्षणांमध्ये फेसयुक्त लघवी, श्वास लागणे, भूक न लागणे, मळमळ आणि उलट्या होणे, खाज सुटणे तसेच थकवा आणि अशक्तपणा यांचा समावेश होतो. जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी एखाद्याला डायलिसिस आणि शेवटी किडनी प्रत्यारोपणाची देखील आवश्यकता असू शकते, असेही डॉक्टरांनी म्हटले.