Mobile Phone Effect On Sperm : सध्या मोबाईल फोन (Smartphone) हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झाला आहे, असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. मोबाईल फोन जितका उपयोगी आहे, त्याचा अतिवापर केल्यास तो आरोग्यासाठी तितकाच घातक ठरु शकतो. एका अभ्यासानुसार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (Electromagnetic Radiation) उत्सर्जित करणार्या मोबाईल फोनच्या (Mobile Phone) वारंवार वापरामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.
मोबाईल फोनच्या जास्त वापरामुळे शुक्राणूवर परिणाम
स्वित्झर्लंडमधील (Switzerland) जिनिव्हा विद्यापीठातील (University of Geneva) एका टीमने 2005 ते 2018 काळात 18 ते 22 वयोगटातील 2,886 स्विस पुरुषांच्या डेटावर आधारित क्रॉस-सेक्शनल अभ्यास केला. मोबाइल फोनचा वारंवार वापर आणि शुक्राणूंची कमी गुणवत्ता यांच्यात संबंध असल्याचं या डेटावरून समोर आलं आहे. दिवसातून 20 पेक्षा जास्त वेळा (44.5 दशलक्ष/mL) फोन वापरणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा (56.5 दशलक्ष/mL) फोन न वापरणाऱ्या पुरुषांच्या गटाच्या सरासरी शुक्राणूंची गुणवत्ता लक्षणीयरीत्या जास्त होती.
मोबाइल फोनचा वापर आणि शुक्राणूंचा संबंध
दरम्यान, जर्नल फर्टिलिटी अँड स्टेरिलिटीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मोबाइल फोनचा वापर आणि शुक्राणूंची गती कमी होणे आणि त्याची संरचनात्मक वैशिष्ट्ये यांच्यात कोणताही संबंध नाही. गेल्या पन्नास वर्षांमध्ये वीर्य गुणवत्तेत झालेली घट स्पष्ट करण्यासाठी विविध पर्यावरणीय आणि जीवनशैली घटक प्रस्तावित केले गेले आहेत, पण मोबाइल फोनची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
गर्भधारणेच्या टक्केवारीवरही परिणाम
शुक्राणूंची गुणवत्ता, एकूण शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गती यासारख्या मापदंडांचे मूल्यांकन करून वीर्य गुणवत्ता निश्चित केली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आकडेवारी नुसार, जर एखाद्या पुरुषाच्या शुक्राणूंची एकाग्रता 15 दशलक्ष प्रति मिलीलीटरपेक्षा कमी असेल, तर त्याला गर्भधारणेसाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल. तसेच, जर शुक्राणूंची एकाग्रता 40 दशलक्ष प्रति मिलीलीटरपेक्षा कमी असेल तर, गर्भधारणेची टक्केवारी कमी होते.
शूक्राणूंची गुणवत्तेवरही परिणाम
गेल्या 50 वर्षांत वीर्य दर्जा घसरल्याचे अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे. शुक्राणूंची संख्या सरासरी 99 दशलक्ष शुक्राणू प्रति मिलीलीटर वरून 47 दशलक्ष प्रति मिलीलीटर इतकी कमी झाल्याचं अहवालात समोर आलं आहे. हा पर्यावरणीय घटक आणि जीवनशैलीच्या सवयी म्हणजेच आहार, अल्कोहोल, तणाव, धूम्रपान यांचा परिणाम असल्याचं मानलं जातं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :