World Ankylosing spondylitis Day 2022 : अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस (AS) हा सांध्यांना सूज आल्यामुळे जडणारा एक प्रकारचा वातविकार आहे. जो प्रामुख्याने पाठीच्या मणक्यावर आणि सॅक्रॉइलिक जॉइंट्स म्हणजे आपला मणका जिथे पेल्व्हिसशी जोडला जातो त्या भागावर परिणाम करतो. यामुळे पाठीचा खालचा भाग, हिप आणि पेल्व्हिक भागात वेदना होतात. भारतामध्ये सध्या सुमारे 10.65 लाख लोकांना या आजाराचे निदान झाले आहे. तसेच ग्लोबल डेटाच्या अभ्यासानुसार हे प्रमाण 2.95 टक्के इतक्या वार्षिक वाढीच्या गतीने वाढेल असा अंदाज आहे. 


या आजाराविषयी अनेकांना कल्पनाही नसते. भारतात 69 रूग्णांच्या अज्ञानामुळे त्यांच्या बाबतीत चुकीचे निदान केले जाते. किंवा त्यांना आपल्या आजाराची माहितीच नसते. मात्र, या आजाराकडे जर दुर्लक्ष केले तर हा आजार पुढे गंभीर होत जातो. अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस (AS)म्हणजे नेमकं काय आणि यावर उपचार कोणते केले जाऊ शकतात. या संबंधित डॉ. प्रवीण पाटील, र्हुमॅटोलॉजिस्ट, एमआरसीपी, एफआरसीपी, सीसीटी-हृमॅटोलॉजी, पुणे यांनी या संबंधित माहिती दिली आहे. 


1. सूज आल्याने होणारा आजार 
 
(AS) हा आजार सांध्यांची नैसर्गिकपणे झीज झाल्याने उद्भवत नाही. तर, शरीरामध्ये सूज आल्याने होतो. तसेच या आजारामध्ये होणा-या वेदना सांध्यांची हालचाल थांबवली की अधिक वाढतात आणि सकाळच्या वेळी या वेदना अधिक तीव्रतेने जाणवतात. 


2. कालपरत्वे मणक्याची हाडे एकमेकांना चिकटली जाऊ शकतात. 


काही लोकांच्या बाबतीत ए.एसमुळे सांध्याच्या झालेल्या हानीमुळे सूज येणे, हाडांची झीज किंवा हाड वाढणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. मात्र, अनेकांच्या बाबतीत पाठीच्या हाडांतील लिगामेन्ट्सवर कॅल्शियमचा थर साचतो आणि त्यामुळे मणके एकमेकांना चिकटतात. यातून रुग्णांना पाठीची हालचाल करणे अशक्य होते. मात्र, वेळीच यावर उपचार केल्यास हा आजार हळूहळू कमी होतो. 



अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिसवरील उपचार :


एकदा या आजाराचे निदान झाले की, त्याची लक्षणे गंभीर होऊ नयेत आणि वेदना सुसह्य व्हाव्यात यासाठी अचूक उपचारांची मदत होऊ शकते. आजाराने गंभीर स्वरूप धारण करू नये आणि कोणतीही अतिरिक्त गुंतागुंत उद्भवू नये यासाठी या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घेणे गरजेचे आहे. 


तरूणपणीच हा आजार होण्याची शक्यता : 

ए.एस तरुणपणीच गाठू शकतो - अनेकदा आपल्याला असे वाटते की उतारवयात हाडांची, सांध्यांची झीज होऊन हा आजार होतो. परंतु, सूज आल्याने होणारा हा संधीवात तरूण वयातही होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, 80 टक्के रूग्णांना तिशीच्या आतच आजाराची लक्षणं दिसू लागतात. तर, जेमतेम पाच टक्के लोकांना पंचेचाळीशी नंतर ही लक्षणं दिसू लागतात. शरीराची चुकीची ढब, बैठी जीवनशैली आणि ताणतणाव यांच्यामुळे भारतातील तरुणांना या आजाराचा धोका अधिक आहे. 


स्त्री आणि पुरुषांवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो - पुरुषांमध्ये पाठीचा मणका आणि पेल्व्हिस या ठिकाणी त्रास होतो. याऊलट, स्त्रियांच्या बाबतीत खांदे, पाय किंवा मानेच्या सांध्यांमध्ये वेदना जाणवतात. एका अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार ए.एस असलेल्या पुरुषांच्या रक्तामध्ये दाहकारक स्थिती दर्शविणा-या घटकांची पातळी अधिक प्रमाणात वाढते. ही वाढ एएस असलेल्या स्त्रियांमध्ये तितक्या अधिक प्रमाणात दिसून येत नाही. ए. एस हा आजार जितक्या प्रमाणात पुरुषांना होतो तितकाच स्त्रियांनाही होतो. मात्र, स्त्रियांना याचे निदान उशिरा होतो. 


खासदार नवनीत राणाही या आजाराने त्रस्त :


खासदार नवनीत राणा यासुद्धा स्पॉन्डिलायटिस या आजाराने त्रस्त आहेत. तुरुंगात असताना त्यांना स्पॉन्डिलायटिस त्रास पुन्हा सुरू झाल्याने त्यांना तुरुंगातून थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :