Hypnic Jerk: गाढ झोपेत (Deep Sleep) असताना अचानक वरून खाली पडल्याचा आभास अनेकदा तुम्हाला देखील झाला असेल. यामुळे तुम्हाला धक्का बसतो आणि तुमची झोप उघडते. असे धक्के जवळजवळ प्रत्येकालाच येतात, स्वप्नात तुम्ही डोंगरावरून पडता किंवा कुठेतरी अडखळून पडता. कधी कधी बेडवरुन खाली पडल्याचा भास आपल्याला होतो आणि आपली झोपमोड होते. काही लोक या भासांमुळे इतके अस्वस्थ होतात की त्या क्षणी त्यांना नीट झोपही (Sleep) येत नाही. तुमच्याप्रमाणेच अनेकांना हा प्रश्न पडला असेल की हे स्वप्न आहे? की समस्या? तर आज जाणून घेऊया की झोपेत असे भास होण्यामागचं कारण.
झोपेत झटका लागणं म्हणजे नक्की काय?
झोपेत लागणाऱ्या या झटक्यांना अथवा धक्क्यांना वैद्यकीय परिभाषेत हायपनिक जर्क (Hypnic Jerk) म्हणतात. हायपनिक जर्क मायोक्लोनस (Hypnic jerk myoclonus) म्हणजे, झोपेचे हे धक्के मेंदूच्या त्या भागात येतात जिथे मेंदूची मूळ प्रक्रिया नियंत्रित केली जाते. हायपनिक जर्क येण्यामागे कोणतं एक असं कारण नाही, तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात.
वास्तविक, झोपेच्या वेळी शरीर पूर्ण विश्रांतीच्या स्थितीत जाते. यावेळी स्नायूंना विश्रांती मिळते आणि हृदयाची गतीही मंदावते. या दरम्यान, हृदय योग्यरित्या काम करत आहे की नाही हे तपासण्याचं काम मेंदू करतो आणि त्यामुळे असे धक्के जाणवतात. याशिवाय, जेव्हा स्नायू विश्रांतीच्या स्थितीत जातात तेव्हा मेंदूला असं वाटतं की आपण खरोखरच पडत आहोत आणि अशा स्थितीत, हायपनिक जर्क सावरण्यासाठी येतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, रात्रीच्या वेळी शरीर झोपते आणि मेंदू पूर्णपणे जागृत असतो आणि कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती येऊ नये म्हणून शरीराला असा धक्का बसतो.
तणाव आणि कॅफिन हे देखील असू शकतं कारण
जे लोक जास्त चहा आणि कॉफी पितात किंवा जास्त व्यायाम आणि वर्कआउट करतात, त्यांना झोपेत हायपनिक जर्क किंवा झटके येण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय मानसिक ताण किंवा झोप न लागणे हे देखील यामागचे कारण असू शकते. अनेक वेळा आपण एवढ्या गाढ झोपेत असतो की मेंदू सोडून शरीराचा प्रत्येक भाग विश्रांतीच्या स्थितीत जातो, त्यामुळे मेंदू शरीर पूर्ण झोपेत आहे असं समजतो आणि शरीराला एक झटका देतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे, परंतु जर तुम्हाला वारंवार झोपेत झटके लागून जाग येत असेल, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे.
हेही वाचा:
Health Tips: कमी झोप आरोग्यासाठी हानिकारक; हृदयावरही होतात 'हे' परिणाम