वॉशिंग्टन : कोविड 19 च्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत कोविड आल्यापासून अनेक नवीन विषाणूजन्य आजार फोफावत आहेत. रोज नवीन विषाणू आल्याचे माध्यमांतून समोर येत आहे. अशातच आता अमेरीकेने पालक आणि आरोग्य सुविधा पुरवणाऱ्यांना नवीन आजाराचा इशारा दिला आहे. पुढील चार महिन्यांत पोलिओसारख्या रोगाचा Acute Flaccid Myelitis (AFM) उद्रेक होण्याची शक्यता रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने Centers for Disease Control and Prevention (CDC) मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.


लहान मुलांमध्ये अचानक विकनेस आला असेल तर पालक आणि डॉक्टरांनी अशा रुग्णांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कारण, हे रुग्ण AFM चे संशयित असू शकतात. विशेषत: ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान. सध्या सुरु असलेला श्वसनाचा आजार, ताप आणि मान किंवा पाठदुखी किंवा कोणत्याही न्यूरोलॉजिकल लक्षणे असतील तर काळजी घेण्याची गरज असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकात नवीन लक्षणांची माहिती देण्यात आली आहे.


एएफएम AFM ही एक वैद्यकीय आणीबाणी असून रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सेवा घ्यावी, अगदी नवीन कोरोनाव्हायरसच्या घटना असलेल्या भागातही. कोरोनाव्हायरस रोगाशी लढण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या उपाययोजनांमुळे, या वर्षीचा उद्रेक ऑगस्टनंतर येण्याची शक्यता आहे. दिलासादायक म्हणजे एएफएम प्रकरणे अपेक्षेपेक्षा कमी असू शकतात, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या आजाराचा धोका सर्वात जास्त मुलांना असल्याने पालकांनी काळजी घेण्याचं आवाहनही यातून करण्यात आलं आहे.