मुंबई : संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये कोरोनाव्हायरसच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हॅरिएंटमुळे पुन्हा कोविडचा संसर्ग होत असलेला दिसून येत आहे. अमेरिका-इंग्लंडमध्ये 70% पेक्षा अधिक लसीकरण होऊनसुद्धा कोविडचे रुग्ण वाढत आहेत तर भारतातही डेल्टा प्लस व्हॅरिएंटचे नवीन रुग्ण सापडत आहेत. तसेच दोन्ही डोस घेऊनसुद्धा लोकांना पुन्हा कोविड संसर्ग होत आहे. यात काहींचा मृत्यू पण झाला आहे. यासाठी कोरोनाव्हायरसचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हॅरिएंट कारणीभूत आहेत. हे दोन्ही व्हॅरिएंट नाकावाटे श्वसनमार्गाच्या वरच्या भागात (नाक/घसा ) याठिकाणी मोठ्या प्रमाणात संसर्ग करीत आहेत. या ठिकाणचा इथला कोरोनाव्हायरसचा लोड कमी करण्यामध्ये सध्याची स्नायूत इंजेक्शन देण्याची (इन्ट्रामस्क्युलर) लसी कमी पडत आहेत असे दिसून येत आहेत. त्यामुळेच लस दिलेला व्यक्ती दुसऱ्या निरोगी व्यक्तीला संसर्गित करत आहे.
नाकावाटे दिलेली लस जास्त फायदेशीर
जर लस नाकावाटे इंट्रा-नेझल स्प्रेच्या स्वरूपात दिली तर नाकातील आणि घश्यातील व्हायरसचा लोड कमी करण्याचे काम प्रभावीपणे करतेय, असे नुकत्याच ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधनातून समोर आले आहे. ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका म्हणजेच भारतातील कोविशील्ड या लसीचा नाकावाटे दिला जाणार स्प्रे तयार करून त्याच्या चाचण्या सुरुवातीला प्राण्यांवर घेण्यात आल्या. यामध्ये असे दिसून आले की नाकावाटे दिलेली लस ही स्नायूत इंजेक्शन दिलेल्या लसीपेक्षा अधिक सक्षमपणे कोविडचा संसर्ग रोखण्यास मदत करत आहेत. तसेच नाकावाटे दिलेल्या लसीमुळे कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स (ताप, सर्दी किंवा अंगदुखी) झालेले नाहीत.
इंट्रा-नेझल स्प्रे लस नाक/घसा इथे काहीशा वेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करीत असून दंडात दिलेल्या लसीमुळे रक्तामध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज ऐवजी या श्वसनमार्गात (mucosal immunity) प्रभावी मेमरी बी आणि टी पेशींची निर्मिती करत आहेत आणि यामुळेच नाक, घास, संपूर्ण श्वसनमार्ग आणि फुफुस याठिकाणचा कोरोनाव्हायरसचा लोड खूपच कमी होतो आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात माकडांवर केलेल्या प्रयोगात असे दिसून आले की सध्याची कोव्हीशील्ड लस माकडांना नाकावाटे दिल्यास त्यांना कोरोनाचा नाकावाटे होणार संसर्ग फारच कमी झाला आहे. शिवाय त्यांच्या फुफ्फुसातील कोरोनाव्हायरससुद्धा जवळजवळ नष्ट झालेला आढळला. नाकावाटे दिलेल्या लसीमुळे फुफ्फुसातील कोरोनाव्हायरस विरुद्धची प्रतिकारशक्ती 70% ने वाढलेली दिसून आली आणि कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या न्यूमोनियाचे कोणतेही लक्षण दिसून आले नाही. आश्चर्य म्हणजे नाकावाटे दिलेल्या लसीमुळे रक्तामध्ये सुद्धा कोरोनाव्हायरस विरुद्धच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या दिसून आल्या. यासाठी नवीन लस तयार करण्याची गरज नसून सध्या लसीकरणासाठी उपलब्ध असलेली लसच वापरली जाईल.
फक्त माकडांवरच प्रयोग केले नसून ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये 54 लोकांवर फेज-1 मधील क्लीनिकल ट्रायल्स सुरु झाल्या असून लवकरच फेज 2 आणि फेज 3 क्लीनिकल ट्रायल्स सुरु होतील. तसेच या इंट्रा-नेझल लसीसाठी पुन्हा सरकारी मान्यता घेण्याची गरज लागली तरी ती अतिशय कमी वेळेत मिळण्याची शक्यता आहे. भारतामधील भारत बायोटेकने सुद्धा अशा प्रकारची लस विकसित करण्याचे काम सुरु केले असून त्याच्यासुद्धा मानवी चाचण्या सध्या सुरु आहेत. अशा प्रकारच्या इतर कंपन्यांच्या लसी संशोधनात आहेत, पण त्या वेगाने वापरात आणण्याची गरज आहे. नाकावाटे लस देण्यासाठी मेडिकल मनुष्यबळाचीही गरज पडत नाही. लसीकरण केंद्रावरही जावे लागण्याची गरज नाही. ती आपण घरीच घेऊ शकतो. साधारणपणे पुढच्या तीन ते सहा महिन्याचा कालावधीत अशा प्रकारची लस उपलब्ध होईल आणि ती लस याआधी दोन डोस दिलेल्या लोकांना बुस्टर डोस म्हणून देता येईल. त्यामुळे लसीकरण झालेल्या लोकांकडून इतर लोकांना कोव्हिडचा संसर्ग रोखता येईल, अशी माहिती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे मेडिकल सायन्स डिव्हिजनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी दिली आहे.