Power Nap Benefits for Brain : काही लोकांना दुपारच्या वेळी झोपण्याची म्हणजेच वामकुक्षी (Power Nap) घेण्याची सवय असते. दुपारची झोप आरोग्यासाठी (Health Tips) चांगली की वाईट याबाबत अनेक मतांतरं आहेत. दिवसा डुलकी किंवा पॉवर नॅप घेण्याबाबत अनेक शक्यता सांगितल्या जातात. काहींच्या मते, दुपारच्या वेळी झोपणं आरोग्यासाठी घातक असल्याचं सांगितलं जातं, तर काही लोक वामकुक्षीचे फायदे सांगतात. दरम्यान, यासंदर्भात आता एक नवीन संशोधन समोर आलं आहे. दुपारच्या वेळी झोपण्याचा नेमका आरोग्यावर काय परिणाम होतं, याचा अभ्यासावरील एक अहवाल उघड झाला आहे.
दुपारची झोप घातक की फायदेशीर?
नवीन संशोधनानुसार, दुपारच्या झोपेचा शरीराची ऊर्जा, विशेषत: मेंदूसोबत (Brain) घनिष्ट संबंध असल्याचं समोर आलं आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन आणि युनिव्हर्सिटी ऑफ रिपब्लिक ऑफ उरुग्वे येथील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात वामकुक्षी आणि मेंदू यांच्यात मजबूत संबंध आढळून आला. नव्या संशोधनानुसार, वामकुक्षी म्हणजेच दुपारच्या वेळेची डुलकी मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामुळे स्मृतिभ्रंश आणि न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांचा कमी धोका होतो, असं अभ्यासात आढळून आलं आहे. संशोधनानुसार, नियमित वामकुक्षी घेतल्यामुळे मेंदूचं संकुचन होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
दुपारच्या वेळी झोप घेणं फायदेशीर
याआधी डुलकीचे फायदेशीर परिणाम दिसून आले आहेत. पण, डुलकी आणि मेंदूच्या आरोग्याचा थेट संबंध सापडल्याचं पहिल्यांदाच समोर आलं आहे. लोकांच्या झोपण्याच्या सवयी निश्चित करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी 97 लोकांच्या डीएनए वर(DNA) मँडेलियन रँडमाइजेशन तंत्राचा वापर केला. हे तंत्र शरीरासाठी घातक घटक आणि रोगांमधील संबंध तपासण्यासाठी वापरलं जातं. या संशोधनामध्ये सहभागी लोकांच्या मनगटावर परिधान केलेल्या एक्सीलरोमीटरद्वारे रेकॉर्ड केलेल्या शारीरिक प्रक्रियांचं मोजमापांसह माहिती एकत्रित करण्यात आली.
संशोधनात काय आढळलं?
या अभ्यासात संशोधकांना असं आढळून आलं की, जे लोक डुलकी घेण्यास प्राधान्य देतात त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होतो. 30 मिनिटे किंवा त्याहून कमी वेळ डुलकी घेणं आणि दिवसा लवकर झोपणे यामुळे रात्रीच्या झोपेमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता कमी होते. संशोधकांनी दावा केला आहे की, या अभ्यासात नियमित डुलकी आणि मेंदूची यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट होतो.
डुलकीचे फायदे
या संशोधनाच्या अहवालानुसार, डुलकी घेण्याचे अनेक फायदे आहेत. दरम्यान, या झोपेच्या अभ्यासाची जगभरातील इतर ठिकाणच्या व्यक्ती आणि त्यांच्या मेंदूच्या कार्यासोबत संबंध तपासणे आवश्यक आहे.