New Digital Health Check : अलिकडच्या काळात जगभरात ह्रदयविकाराच्या (Heart Attack) रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ह्रदयविाकाराचा वाढता धोका लक्षात घेता, इंग्लंड सरकार आरोग्यासंबंधित विशेष उपाययोजना करत आहे. आता इंग्लंडमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी घातक रोग टाळण्यासाठी नवीन डिजिटल आरोग्य तपासणी सुरु करण्यात येणार आहे. 2024 पासून संपूर्ण इंग्लंडमध्ये डिजिटल राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) तपासणी सुरू केली जाईल. 2024 च्या वसंत ऋतूमध्ये संपूर्ण इंग्लंडमध्ये ही योजना सुरु केली जाईल, अशी घोषणा इंग्लंड सरकारने 29 जून रोजी केली आहे.
हृदयविकाराचा वाढता धोका!
सध्या इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा विभागाकडून NHS योजना राबवण्यात सुरु असून त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि ह्रदयासंबंधित गंभीर आजार टाळण्यास मदत झाली आहे. सध्या इंग्लंडमध्ये 40 ते 74 वयोगटातील प्रौढांसाठी प्रत्यक्ष आरोग्य तपासणी केली जाते. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आरोग्य तपासणीमुळे स्ट्रोक, मूत्रपिंडाचा आजार, हृदयरोग, टाइप 2 मधुमेह किंवा स्मृतिभ्रंश यासारख्या रोगांचं निदान होण्यास मदत झाली आहे.
हृदयरोग इंग्लंडमधील मोठी समस्या
हृदयरोग इंग्लंडमधील दुसरा सर्वात मोठी समस्या आहे. यामुळे सुमारे 6.4 दशलक्ष लोकांवर परिणाम होतो आणि याचा भार आरोग्य यंत्रणेवर पडतो. नवीन डिजिटल चाचणी 200,000 लोकांना विविध रोगांचं निदान करण्यात मदत करेल. राष्ट्रीय आरोग्य सेवा तपासणीत गेल्या चार वर्षांमध्ये उच्च रक्तदाबाची 30,000 प्रकरणं आणि 400 हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक टाळण्यास मदत झाली आहे.
आरोग्य सेवेवरील ताण कमी होईल
NHS डिजिटल तपासणी सेवेमुळे आरोग्य प्रशासनावरील ता कमी करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक डिजिटल तपासणीमुळे अंदाजे 20 मिनिटे राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) विभागाच्या वेळेची बचत होऊ शकते. हा वेळ इतर गंभीर रुग्णांना उपचार देण्यासाठी कामी येईल. डिजिटल तपासणीमुळे रुग्णांना मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकाद्वारे डिजिटल आरोग्य तपासणी करता येईल. रुग्ण ऑनलाइन उंची, वजन आणि रक्तदाब मोजमाप आणि रक्त चाचणी अहवाल पाहू शकतील आणि त्यानुसार, उपचार घेऊ शकतील.
लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाची प्रकरणांमध्ये वाढ
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी सुमारे 1.3 दशलक्ष आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये 315,000 लठ्ठपणा आणि 33,000 उच्च रक्तदाबाची प्रकरणं समोर येतात. तसेच 400 हून प्रकरणांमध्ये रुग्णांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक टाळण्यास मदत झाली आहे. वसंत ऋतू 2024 पासून सध्याच्या वैयक्तिक NHS आरोग्य तपासणी सोबतच नवीन डिजिटल NHS आरोग्य तपासणी करण्यात येईल.
घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला
आरोग्य आणि सामाजिक स्वास्थ सचिव स्टीव्ह बार्क यांनी सांगितलं की,''आरोग्य तपासणी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक टाळता येऊ शकतो. यामुळे रुग्णांचा जीव वाचवण्यासोबत आणि राष्ट्रीय आरोग्य सेवेवरील (NHS) दबाव कमी करता येईल. या नवीन डिजिटल चेक-अपमुळे नागरिक सामान्य चाचण्या करु शकतात आणि घरबसल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊ शकतात, यामुळे आरोग्य सेवांवरील दबाव कमी करण्यात मदत होईल.''