Symptoms Of Heart Attack And Stroke: हार्ट अटॅक (Heart Attack).. आधी हृदयविकाराची लक्षणं वयोवृद्ध व्यक्तींमध्ये दिसून यायची. पण आता अगदी किशोरवयातील मुला-मुलींमध्येही हार्ट अटॅकची लक्षणं पाहायला मिळतात. भारतात गेल्या तीन वर्षांत हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आज एखादी व्यक्ती तुम्हाला भेटते, बोलते आणि त्यानंतर काळी काळातच तिच्या निधनाचं वृत्त तुमच्यापर्यंत पोहोचतं. अनेक सेलिब्रिटींनीही फारच कमी वयात हार्ट अटॅकनं जीव गमावला आहे. हार्ट अटॅक किंवा हृदयविकार ही जगभरासह भारतातही मोठी समस्या होत चालली आहे. अगदी चालता-बोलता, जिममध्ये व्यायाम करताना, गाताना, नाचताना किंवा खेळताना हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची अनेक उदाहरण गेल्या काही दिवसांत पाहिली आहेत. 


WHO नं हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या लक्षणांबाबत केलंय ट्वीट 


अनियमित जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, झोप न लागणं, अनुवंशिकता अशी हार्ट अटॅक येण्यामागची प्रमुख कारणं आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यायच्या एक महिना आधी शरीरात विशिष्ट प्रकारची लक्षणं दिसतात, ज्याकडे आपण सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतो. अशातच 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'ने ट्वीट करुन हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यापूर्वी जाणवणाऱ्या लक्षणांविषयी माहिती दिली आहे. WHO च्या ट्वीटमध्ये काही लक्षणांची यादी देण्यात आली आहे. ही लक्षणं हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्यापूर्वी तुम्हाला जाणवतात. 






हार्ट अटॅकमध्ये काय होतं?


जेव्हा हृदयातील रक्त प्रवाह कमी होतो किंवा रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात किंवा मग ज्यावेळी रक्त हृदयापर्यंत योग्यरित्या पोहोचत नाही, तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. रक्त पुरवठ्याच्या कमतरतेमुळे, हृदयाच्या पेशींमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.


हृदयविकाराची लक्षणं काय?



  • छातीत दुखणं

  • मान आणि पाठदुखी

  • पाठ आणि खांद्यांना विचित्र वेदना जाणवणं आणि जखडल्यासारखं वाटणं 

  • थकवा

  • चक्कर येणं

  • हृदयाचे ठोके वाढणं 


महत्त्वाची बाब म्हणजे, पुरूष आणि स्त्रियांमध्ये ही लक्षणं वेगवेगळी असू शकतात. 


NCRB अहवाल काय सांगतो?


एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या आकस्मिक मृत्यूची आकडेवारी पाहिली, तर त्यातील 14 टक्के मृत्यू केवळ हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं समोर आलं आहे. तर 2022 मध्ये 56 हजार लोकांचा अचानक मृत्यू झाला. त्यापैकी 57 टक्के लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाला. हा आकडा कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा खूपच जास्त आहे. 


2022 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं 32 हजार 140 लोकांचा मृत्यू झाला. जे 2021 च्या तुलनेत खूप जास्त होते. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर, देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात हृदयविकाराच्या झटक्यानं सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 2022 मध्ये 12,591 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर केरळमध्ये 3,993 आणि गुजरातमध्ये 2,853 मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला आहे. 


महिलांपेक्षा पुरुषांना हृदय विकाराचा धोका अधिक 


हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या पुरुषांची संख्या 28 हजार आहे, तर महिलांची संख्या 22 हजारांच्या आसपास आहे. तसेच, अति व्यायाम केल्यानंही हार्ट अटॅक येऊ शकतो, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Weight Loss Tips : सगळे म्हणतात, जिऱ्याचं पाणी प्या, वजन कमी होईल; पण खरंच असं होतं का?