Summer Health Tips : उन्हाळा (Summer) सुरु झाला आहे. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे शरीराची लाही लाही होत आहे. अशा हवामानात आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या ऋतूमध्ये पोटाच्या समस्या जास्त होतात. उन्हाळ्यात तोलून मापून अन्न खावं लागतं. तळलेले पदार्थ थोडेसे खाल्ले तरी त्याचा परिणाम जाणवू लागतो. अशा परिस्थितीत तुम्हाला अशाच काही सुपरफूडबद्दल (Superfood) सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने तुमचे पोटही थंड राहिल, तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुम्ही निरोगीही राहाल. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...
हंगामी फळे : उन्हाळ्यात बरीच हंगामी फळं बाजारात विकली जातात, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्ही कलिंगड, द्राक्षे, संत्री, खरबूज यासारखे फळे खा. यामुळे तुम्ही हायड्रेट राहाल आणि तुमचे पोटही थंड राहिल. कलिंगडामध्ये 91% पाणी असते, त्यामुळे त्याचे सेवन नक्कीच करा. यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची गरज पूर्ण होण्यास मदत होते. याशिवाय अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी युक्त कलिंगड तुमच्या शरीराला थंडावा देईल. दुसरीकडे, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
हंगामी भाज्यांचे सेवन : उन्हाळ्यात कोशिंबीर भरपूर खा. काकडी, झुकिनी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या खा. या भाज्यांमध्ये पोट थंड राहते आणि तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. काकडीमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पोट व्यवस्थित राहतं. काकडी खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. त्यात पाण्याचे प्रमाणही अधिक असते. दुसरीकडे, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, तांबे, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे झुकिनीमध्ये आढळतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ थांबते. त्यामुळे पचनक्रियाही सुधारते.
नारळ पाणी : उन्हाळ्यात तुम्ही नारळाचे पाणी जरुर प्यावे, त्यात इलेक्ट्रोलाईट्स असतात, ते तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करु शकतात. तसंच पोट थंड ठेवण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामध्ये थंडावा असतो ज्यामुळे उष्माघातापासून संरक्षण होते.
दही : दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात दहीचं सेवन अवश्य करा. दही हा प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे जो आतडे निरोगी राखण्यात मदत करु शकतो. तसेच पोट थंड आणि शांत राहण्यास मदत होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लस्सीच्या स्वरुपात दही खाऊ शकता किंवा रायता किंवा ताक बनवल्यानंतर ते खाऊ शकता. ताक प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही.
पुदिन्याची चटणी : उन्हाळ्यात तुमच्या जेवणात पुदिन्याच्या चटणीचा नक्कीच समावेश करा. त्यामुळे पोट थंड ठेवण्यास मदत होते. मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तरीही पुदिन्याची चटणी पोट शांत ठेवण्यास मदत करते.