Spinal Stroke Symptoms: ब्रेन स्ट्रोक प्रमाणे, स्पायनल स्ट्रोकची (Spinal Stroke) प्रकरणंही जगभरात वेगानं वाढली आहेत. ज्याप्रमाणे मेंदूला होणारा रक्तपुरवठा (Blood Supply) कमी झाल्यावर ब्रेन स्ट्रोक येतो, त्याचप्रमाणे मणक्याला होणारा रक्तपुरवठा प्रभावित झाल्यास स्पायनल स्ट्रोकचा धोकाही वाढतो. स्पायनल स्ट्रोक खूप धोकादायक आहे, यामुळे पक्षाघात (Paralysis) होऊ शकतो. तसेच, बऱ्याचदा स्पायनल स्ट्रोक घातकही ठरतो. स्पायनल स्ट्रोक म्हणजे काय (What is Spinal Stroke) आणि त्याची लक्षणं (Spinal Stroke Symptoms) कशी ओळखता येतील हे आज जाणून घेऊयात... 


स्पायनल स्ट्रोक म्हणजे काय?


पाठीच्या मणक्याचं काम योग्य पद्धतीनं होण्यासाठी रक्तपुरवठा सुरळीत होणं गरजेचं असतं. पाठीचा कणा शरीराच्या इतर अवयवांना काम करण्याचे संकेत पाठवण्याचं काम करतो. पाठीच्या कण्याद्वारे पाठवलेल्या सिग्नलमुळेच शरीराची अनेक कार्य, म्हणजेच  जसं की हात आणि पाय हलवणं, शरीराच्या इतर भागांचं संचालन देखील याद्वारे केलं जातं. जेव्हा पाठीच्या कण्याला योग्य रक्तपुरवठा होत नाही, तेव्हा त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठाही विस्कळीत होतो. या समस्येला स्पायनल स्ट्रोक तसेच स्पाइन कॉर्ड इन्फेक्शन असंही म्हणतात. रक्त गोठणं, दुखापत किंवा रक्तस्त्राव यामुळे रक्तपुरवठा खंडित होतो. या पुरवठ्यात व्यत्यय आल्यानं मणक्याच्या ऊतींचं आणि पेशींचं नुकसान होतं आणि पेशीं नष्ट होऊ शकतात. पेशी नष्ट असल्यानं हात आणि पाय यांच्या कार्यावर परिणाम होतो. स्पायनल स्ट्रोक आलेल्या व्यक्तीचे हात पाय हलत नाहीत, त्याला अर्धांगवायू देखील होऊ शकतो.


स्पायनल स्ट्रोकची सामान्य लक्षणं


स्पायनल स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी सर्वात आधी याची सुरुवातीची आणि सामान्य लक्षणं ओळखणं गरजेचं आहे. स्पायनल स्ट्रोक येण्यापूर्वी काही तास आधी रुग्णांना स्नायूंमध्ये वेदना जाणवू लागतात. तसेच, त्यांना चालताना त्रास होऊ लागतो. त्यानंतर हळूहळू रुग्णाचे हात-पाय सुन्न होऊ लागतात. रुग्णाचं लघवीवरील नियंत्रणही सुटतं. अशा परिस्थितीत रुग्णास श्वास घेतानाही त्रास होऊ लागतो. श्वास घेण्यास त्रास होणं हेदेखील स्पायनल स्ट्रोकचं लक्षण आहे. या प्रकरणांमध्ये अनेकदा रुग्णाला अर्धांगवायू होतो. तसेच, स्पायनल स्ट्रोक आल्यास बऱ्याचदा रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


सावधान! रात्री उशिरापर्यंत जागरण पडेल महागात, लवकर मृत्यू होण्याचा धोका; संशोधनात 'ही' धक्कादायक बाब उघड