Brain-Eating Amoeba: गेल्या दोन वर्षांपासून जगासह देशभरात कोरोना व्हायरसनं (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. अजुनही संपूर्ण जग कोरोनाच्या धास्तीखाली जगत आहे. अशातच आता आणखी एका नव्या व्हायरसनं जगाची धास्ती वाढवली आहे. दक्षिण कोरियामध्ये सध्या नेग्लेरिया फॉऊलेरी म्हणजेच 'ब्रेन इटिंग अमिबा'नं (Brain-Eating Amoeba) धाकधूक वाढवली आहे. या संसर्गाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद दक्षिण कोरियामध्ये (South Korea) करण्यात आली आहे. 


कोरिया डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन एजन्सी (Korea Disease Control and Prevention Agency - KDCA) नं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. थायलंडहून (Thailand) परतल्यानंतर मरण पावलेल्या एका कोरियन नागरिकाला नेग्लेरिया फाऊलेरीची (Naegleria Fowleri) लागण झाल्याची माहितीही KDCAनं दिली आहे. नेग्लेरिया फाऊलेरी म्हणजेच 'ब्रेन इटिंग अमिबा'. या आजारात मानवाच्या मेंदूच्या पेशींचा हळूहळू नाश होतो. 


दक्षिणपूर्व आशियाई देशात चार महिने राहिल्यानंतर 50 वर्षीय व्यक्ती 10 डिसेंबर रोजी कोरियाला परतला होता. परंतु, परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीला प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसांच्या उपचारानंतर गेल्या आठवड्यात मंगळवारी या व्यक्तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 


काय आहे 'ब्रेन इटिंग अमिबा'? 


ब्रेन इटिंग अमिबाचे वैज्ञानिक नाव हे नेग्लरिया फाऊलेरी (Naegleria fowleri) असं आहे. हवामान बदलाच्या संकटामुळे याचा संसर्ग पसरत असल्याचं सांगण्यात येतं आहे. हा घातक अमिबा मनुष्याच्या मेंदूत शिरकाव करतो आणि मेंदूच्या पेशी कुरतडायला सुरुवात करतो. या अमिबामुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. 


कोरोनाच्या संकट काळात या अमिबाचा प्रसार हा उत्तर अमेरिकेतील काही राज्यांमध्ये झाल्याचं दिसून आला होता. ब्रेन इटिंग अमिबा हा पाण्याशी संबंधित असतो. पाणी हे रोजच्या आपल्या जीवनातील रोजचा घटक असल्यानं त्यापासून दूर राहता येत नाही. 


'ब्रेन इटिंग अमिबा'ची लक्षणं आणि कारणं? 


1937 मध्ये पहिल्यांदा युनायटेड स्टेट्समध्ये या आजाराची नोंद करण्यात आली होती, ही देशातील पहिली घटना आहे. Naegleria fowleria हा अमिबा आहे, जो सामान्यतः जगभरातील उबदार गोड्या पाण्याचे तलाव, नद्या, कालवे आणि तलावांमध्ये आढळतो. अमिबा नाकातून श्वासामार्फत शरीरात प्रवेश करतो आणि नंतर मेंदूमध्ये प्रवेश करतो. हा अत्यंत घातक आजार आहे. एखाद्या व्यक्तीला ब्रेन इटिंग अमिबा या आजाराची लागण झाली, तर रुग्णाला सुरुवातीला डोकेदुखी, ताप येणं, मळमळणं, उलट्या येणं आणि अस्वस्थ वाटणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. हा अमिबा थेट मानवाच्या मेंदूवर हल्ला करतो आणि त्यामुळे मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट होतात. 


संसर्गाचा धोका कमी 


केडीसीएनं म्हटलं आहे की नेग्लेरिया फॉऊलेरीचा मानव-ते-मानव प्रसार होण्याची शक्यता कमी आहे. परंतु, स्थानिक रहिवाशांना रोग पसरलेल्या भागांत प्रवास करणं टाळण्यास सांगणं गरजेचं आहे. 2018 मध्ये अमेरिका, भारत आणि थायलंडसह जगभरात Naegleria fowleri च्या एकूण 381 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Heart Attack : शरीराच्या 'या' भागात वेदना होत असतील तर वेळीच सावध व्हा; हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं असू शकतात