Retina Health : नजर कमकुवत असणे हे काही जनुकांद्वारे पुढच्या पिढीत येणारे डॉमिनंट किंवा रिसेसिव्ह वैशिष्टय नव्हे. मात्र, अनेक कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्यांपासून ही समस्या आढळून येते, हे सुद्धा तितकेच खरे आहे. इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीनुसार जगभरात 20 लाखांहून अधिक लोकांना अनुवांशिक किंवा इतर कारणामुळे होणाऱ्या रेटिनाच्या जनुकीय आजारांचा सामना करावा लागत आहे. या स्थितीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या 270 जनुकांची ओळख आतापर्यंत पटली आहे. डोळ्यांवर (EYE) परिणाम करणारा डायबेटिक रेटिनोपॅथी हा मधुमेहजन्य आजार व केंद्रीय दृष्टी धूसर करणारा व वयोमानामुळे जडणारा एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन आजार यांसारख्या रेटिनाच्या प्रमुख आजारांचा संबंध जनुकीय घटकांशी जोडला गेलेला आहे.


डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) आणि कौटुंबिक पार्श्वभूमी


डायबेटिक रेटिनोपॅथी ही एक अशी स्थिती आहे, ज्यात रेटिना अर्थात नेत्रपटलातील रक्तवाहिन्यांची हानी होते. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये डीआरची वारंवारता आणि तीव्रता वेगवेगळ्या प्रमाणात आढळून येते. काही रुग्णांमध्ये मधुमेह फारसा जुना नसला आणि साखरेवर उत्तम नियंत्रण असले, तरीही डीआरची गुंतागुंत उद्भवते आणि तर काही रुग्णांच्या बाबतीत दीर्घकाळापासून मधुमेह किंवा दीर्घकालीन हायपरग्लायसेमिया असूनही त्यांच्यामध्ये डीआरची लक्षणे दिसून येत नाहीत. डीआर विकसित होण्याच्या बाबतीत दिसून येणाऱ्या या असमानतेचे स्पष्टीकरण कदाचित जनुकीय फरकामध्ये सापडू शकेल. भारतामध्ये 7.3 कोटीहून अधिक लोक मधुमेहग्रस्त असून या रुग्णांमध्ये जनुकीय घटकांमुळे डीआरची स्थिती विकसित होण्याचा धोका वाढण्याची शक्यता 50 टक्‍के इतकी आहे. जर, कुटुंबात आधीच्या पिढ्यांमध्ये हा आजार असेल, तर पुढच्या पिढीनेही या आजाराची संभाव्यता पडताळण्यासाठी दरवर्षी तपासणी करणे गरजेचे आहे.


जेनेटिक आणि एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी)


एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन हा एक उत्तरोत्तर गंभीर स्वरूप धारण करत जाणारा आजार आहे, जो रुग्णाच्या केंद्रीय दृष्टीवर परिणाम करतो. एएमडी असलेले सुमारे 15 टक्‍के ते 20 टक्‍के लोकांच्या बाबतीत पालक किंवा एखादे भावंड अशा थेट नात्यातील एकातरी व्यक्तीला हा आजार असतो. निकृष्ट जीवनशैली, धूम्रपान, इतर वैद्यकीय स्थिती आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयी हे या आजाराला कारणीभूत ठरणारे किंवा त्याचा धोका वाढवणारे इतर काही प्रमुख घटक आहेत. संशोधकांना एएमडीशी संबंधित 30हून अधिक जनुके सापडली आहेत.


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर कुटुंबामध्ये या आजारांचा पूर्वेतिहास असेल तर मधुमेहाचे निदान झाल्यावर रुग्णांना नेहमीच डोळ्यांची तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो आणि एएमडीची शक्यता पडताळण्यासाठी वयाच्या पन्नाशीनंतर वार्षिक नेत्रतपासणी करून घेण्यास सांगितले जाते. मधुमेहाच्या परिणामकारक व्यवस्थापनाद्वारे डायबेटिक रेटिनोपॅथी टाळता येऊ शकते, मात्र म्हातारपणी प्रत्येकालाच येणार असल्याने एएमडी ही एक अटळ स्थिती आहे.


काळजी घेणे आवश्यक!


रेटिनाच्या आऱोग्याकडे दुर्लक्ष केल्याने डोळ्यांना त्रास तर जाणवतोच पण ही स्थिती कायमच्या अंधत्वालाही कारणीभूत ठरू शकते. तुमच्या कुटुंबामध्ये डोळ्यांच्या आजारांचा पूर्वेतिहास असेल, तर आपल्या ऑप्थॅल्मोलॉजिस्ट्सचा सल्ला नियमितपणे घेऊन, त्यांनी सांगितलेले उपचार शिस्तबद्धरित्या करणे आवश्यक आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)


महत्वाच्या बातम्या :