मुंबई : बदललेल्या जीवनशैलीमुळे कमी वयात संधिवाताचा त्रास होण्याचा धोका दुप्पटीनं वाढू लागला आहे. त्यातच पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये संधिवाताचा त्रास अधिक प्रमाणात आढळून येतोय. पाचपैकी एक महिला संधिवाताने (Rheumatoid arthritis) पीडित आहे. कौटुंबिक आणि ऑफिसची जबाबदारी या धावपळीमुळे महिलांना संधिवाताचा धोका अधिक असतो. संधिवाताचा त्रास हा वृद्धत्वाकडे झुकल्यानंतरच होतो, असा अनेकांचा समज आहे. पण सध्या तरूणांमध्ये हा आजार प्रकर्षाने दिसू लागला आहे. वेळीच निदान व उपचार न झाल्यास अपंगत्त्वाचा सामनाही करावा लागू शकतो. म्हणून संधिवाताच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणं गरजेचं आहे, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतायेत.


संधिवात म्हणजे रूमेटाइड अर्थराइटिस हा सामान्यपणे आढळणारा वातरोग आहे. यामध्ये सांध्यांना दीर्घकालीन वेदना व दाह होतो. स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीरावर आक्रमण करून त्यास इजा करू लागते, तेव्हा संधिवात होतो. संधिवात कुठल्याही वयात होऊ शकतो. मात्र, सध्या तरूण वयोगटातील व्यक्तींमध्ये हा अधिक प्रमाणात आढळतोय. लठ्ठपणा, धूम्रपान, तणाव आणि गतिहीन जीवनशैली हे यामागील मुख्य कारणं आहेत. 


संधिवातामुळे सांध्याला सूज येणं, वेदना होणं आणि लालसरपणा येतो. स्नायू कमजोर होऊ होऊन सांध्याचा आकार बदलू लागतो. सुरूवातीला संधिवात हातांच्या व पायांच्या बोटांच्या सांध्यावर आघात करतो. जसजसा वात वाढत जातो मनगट, गुडघे, हाताचे ढोपर, खांदे आणि मानेवर लक्षणे दिसू लागतात.


मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सल्लागार डॉ. धीरज सोनवणे म्हणाले की, ‘‘संधिवाताचे अनेक प्रकार असून व्यक्तीनुसार त्यांची लक्षणे वेगवेगळी असतात. ऑस्टियोआर्थराइटिस (Osteoarthritis), रूमँटॉइड अर्थरायटिस (Rheumatoid arthritis) आणि फायब्रोमायल्जिया (Fibromyalgia) हा आजार सामान्यतः महिलांमध्ये अधिक दिसून येतो. पाच पैकी एक महिला रूमेटाइड अर्थरायटिसनं पीडित आहे. अतिरिक्त वजन असलेल्यांना बऱ्याचदा गुडघ्याच्या ऑस्टियोआअर्थराइटिसचा (Osteoarthritis) सामना करावा लागू शकतो. अपघातात गुडघ्याला दुखापत होणं, रजोनिवृत्ती, पूर्वीचा संसर्ग आणि तणाव यामुळेही संधिवाताचा त्रास संभवू शकतो. संधिवाताचा त्रास असणारे 20 ते 30 वयोगटातील दररोज 10-15 तरूण व्यक्ती उपचारासाठी येत आहेत. ऑफिसमध्ये एकाच जागी ठिकाणी बसून काम करणं हे संधिवाताचे मुख्य कारण आहे. संधिवाताचा धोका टाळण्यासाठी चालणे, पोहणं, योगा आणि सायकलिंग सारखे व्यायाम करणं गरजेचं आहे. वाढता तणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणं गरजेचं आहे.’’


मुंबईतील लोकमान्य रूग्णालयातील ऑर्थोपेडिक (Foot and Ankle Specialist) डॉ. श्याम ठक्कर म्हणाले की, ‘‘संधिवाताची समस्या ही सध्या प्रत्येकामध्ये दिसून येत आहे. परंतु, पुरूषांच्या तुलनेत महिलांना रूमेटाइड अर्थरायटिसचा त्रास जास्त पाहायला मिळतो. यामागील नक्कीच असं कुठलंही कारण सांगत येत नाही. सध्या रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या 10 पैकी सहा रूग्णाला संधिवाताचा त्रास होता. हे सर्व रूग्ण साधारणतछ 40 ते 50 वयोगटातील असतात. तरूणांमध्येही संधिवाताचे प्रमाण वाढत आहे. यासाठी विविध प्रकारचे खेळ कारणीभूत ठरतायेत. मैदानी खेळ खेळताना दुखापत झाल्यानं याकडे लक्ष न दिल्यास अनेकदा संधिवाताचा त्रास होतो. संधिवाताचा त्रास वाढल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. म्हणूनच सांध्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार केल्यास हा त्रास कमी करता येऊ शकतो.’’


कोहिनूर रूग्णालयातील वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. फहद शेख म्हणाले की, ‘‘गुडघ्याचा ऑस्टियोआर्थराइटिस होण्याचा धोका हा प्रामुख्याने बैठी कामं करणाऱ्या लोकांना जास्त असतो. याशिवाय धुम्रपानामुळे रूमटाइड अर्थरायटीसचा धोका अधिक असतो. बहुतेक तरूण सध्या संधिवाताच्या दुखण्याने पीडित आहेत. धावपळीची जीवनशैली आणि मैदानी खेळ यामुळे कमी वयात गुडघ्याला दुखापत झाल्याने संधिवाताचा त्रास होणं हे याचे प्रमुख कारण आहे.’’