वसई : सध्या देशभर लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) रणसंग्राम सुरु आहे. निवडणुकांच्या लढाईत कार्यकर्ते सेनेचं काम करत असतात. सध्या मे महिना सुरु असून, बाहेर कडक ऊन आहे. ऊन्हात काम करुन, तसेच निवडणुकीच्या धावपळीत अनेक कार्यकर्ते आजारी पडतात. अशा वेळी ऐन निवडणूकीत आपल्या कार्यकर्त्यांची काळजी कशी घ्यावी, कार्यकर्त्यांचं आरोग्य कसं राखलं जावं याबाबत प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी विरारचे डॉक्टर हेमंत जोशी यांच्याशी बातचीत केली आहे.


वाढत्या तापमानात 'अशी' काळजी घ्या


विरारमधील जोशी हॉस्पीटल एम.डी. डॉ. हेमंत जोशी यांनी सांगितलं आहे की, निवडणूका ही एक लढाई आहे. कार्यकर्त्यांची सेना ती लढाई लढते. निवडणुकीच्या जास्त कामामुळे तसेच या कडक ऊन्हात काम केल्याने अनेक कार्यकर्ते आजारी पडतात. त्यामुळे नेत्यांची फार दमछाक होते. नेपोलियनने शेवटची लढाई फक्त आजारी पडल्यामुळे हरला होता, असं होवू नये म्हणून आपण कार्यकर्त्यांचे आरोग्य चांगलं राखलं पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. यंदाची निवडणूक मेच्या कडक उन्हात आहे. त्यामुळे ऊन लागून अनेक कार्यकर्ते आजारी पडतील. तहान लागणार नाही, तरी सतत पाणी पीत रहा. पातळ अन्नाचा आहार जास्त घ्या. 


चहा-कॉफीचे सेवन टाळा


चहा-कॉफी, बिस्कीट ऐवजी ताक, फळे, पन्हे, कोकम, लिंबू सरबत घ्या. या आहाराचे बंद डबे पिशव्यासोबत ठेवा. चहा, कॉफीने लघवी जास्त होते. पाणी अंगातून जाते. चहा-कॉफीमध्ये कॅफन नावाचे रसायन असते ,त्याने आपला रक्तदाब वाढतो, छातीत धडधड होते, त्याने चिडचिड होते. त्यामुळे माणसे दुखावली जातात. अनेक वेळा झोप खराब होते. त्याने दुसऱ्या दिवशी सुस्ती येते, म्हणून चहा-कॉफी नेहमीसाठी टाळा. त्याऐवजी ताक, पन्हे, लिंबू सरबत घ्या, ते सर्वोत्तम आहेत. 


फळे, सलाड याचं सेवन अधिक करा


संत्री, खरबूज, टरबूज, कलिंगड अशी रसाळ फळे, जमेल तेव्हा पोटभर खा. सर्व फळे, सलाड यात निम्मे पाणी असते, याचं अधिक सेवन करा. ताक मेंदूला लागणारे बी 12 जीवनसत्व पण देते. ताक अमृत आहे. यासोबत काकडी, केळी तसेच चणे, शेंगदाणे आणि पाणी गाडीत ठेवा आणि इतर सर्वांना द्या. शक्यतो बाहेरचे खावू नका. निवडणुकीत अनेक वेळा बाहेरचं खावं लागतं. चहा घ्यावा लागतो, त्याला नम्रपणे हात जोडून धन्यवाद म्हणून नाही म्हणा. भूक असेल तरच, खा नाहीतर खाऊ नका. 


सैल कपडे परिधान करा


त्याचबरोबर आपण जे कपडे परिधान करतो, ते ही कपडे सैल असावे. होजिअरी कपडे वापरा त्या कपड्यांना छिद्र असतात. ते चांगले कपडे असतात. गर्मी वाढेल असे कपडे घालू नका, दक्षिणेत लोकं लुंगी घालतात. त्यासारखं आपण ही ढिला पायजामा, ढिले टिशर्ट, पॅन्ट हे घालावे. शक्यतो पांढरे कपडे घाला. रंगीत कपडे तापतात, काळे कपडे सर्वात जास्त तापतात. डोक्याला ऊन लागतं त्यामुळे पक्षाच नाव असेलेली टोपी घाला. गॉगलचा वापर करा, पूर्ण पाय झाकणारे बूट किंवा सॅँडल वापरा, शक्यतो चप्पलचा वापर टाळा.


शरीराचे स्नायू मोकळे करा


निवडणूक काळात झोप कमी मिळते त्यामुळे जेव्हा आपण बसाल, तेव्हा आपल्या शरीराचे स्नायू ढिले करायला शिका, स्वतः ला सांगा की, मी आता डाव्या पायाच्या मांडीचे स्नायू ढिले करत आहे. ते ढिले होत आहे, असे आपण अनुभवाल. लांब-लांब श्वास घ्या आणि सोडा. चित्ता व्हा. चित्ता हा प्राणी झाडाच्या फांदीवर बसतो, तो सर्वांग ढिले करतो. त्याचे हात पाय ढिले लटकलेले असतात. मेंदू मात्र सावध असतो. डोळे हरीण शोधत असतात. हरिण दिसताच तो उडी मारतो. त्यामुळे जेव्हा जमेल, तेव्हा स्नायू ढिले करा. आपला थकवा कमी होईल, झोपेची गरज घटेल. विजयाचे चित्र मनाने बघा. झोपते वेळी आणि जेव्हा डोळे बंद करुन, शांत बसाल तेव्हा डोळ्यासमोर आपण जिंकलो आहे, असे चित्र मनाने तयार करुन दरवेळी बघा. ते खरे होईल आणि आपण यशस्वी होणार.