Diabetes Study : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यस्त जीवनशैली (Lifestyle) आणि आरोग्याकडे (Health) होणारं दुर्लक्ष यामुळे अनेक आजारांनं आमंत्रण मिळतं. यातीलच एक आजर म्हणजे मधुमेह (Diabetes). अलिकडच्या काळात देशातील मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एका नव्या अहवालानुसार, कर्नाटकमधील 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह असल्याचं अभ्यासात उघड झालं आहे.
10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह
देशात मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले असून कर्नाटक रेड झोनमध्ये आहे. प्रत्येक 10 व्यक्तींमागे एका व्यक्तीला मधुमेहाची लागण होणं, हा चिंतेचा विषय आहे. 5.3-16.0 च्या प्रमाणात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येवर कर्नाटक राज्याचं प्रमाण 10.6 असल्याचं एका अभ्यासातून समोर आला आहे. याचा अर्थ असा आहे की, मोठ्या संख्येने लोक आधीच मधुमेही आहेत आणि पुढील पाच वर्षांत आणखी अनेकांना मधुमेहाचं निदान होण्याची शक्यता आहे. या अभ्यासामध्ये, बंगळुरूसारख्या मेट्रो शहरांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जास्त असण्याचा धोका जास्त आहे.
प्री-मधुमेह हा देशासाठी चिंतेचा विषय
मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशन (MDRF) आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या सहकार्याने हा अभ्यास करण्यात आला. लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या इंडिया डायबेटीस (ICMR-INDIAB) अभ्यासानुसार, सध्या भारतात 101 दशलक्ष मधुमेही आहेत. ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 11·4 टक्के आहे. प्री-मधुमेह हा देशासाठी एक मोठा चिंतेचा विषय आहे. यामध्ये किमान 136 दशलक्ष लोक, म्हणजे 15.3 टक्के लोकांना याचं निदान झालं आहे.
देशातील एकूण 1,13,043 व्यक्तींची तपासणी
एमडीआरएफचे (MDRF) अध्यक्ष आणि अहवाल लिहीणारे डॉ. रणजित मोहन अंजना यांनी सांगितलं की, "राज्यातील 10 पैकी एकाला मधुमेह आहे, जो चिंताजनक आहे." या संशोधनात संपूर्ण देशातील एकूण 1,13,043 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. 18 ऑक्टोबर 2008 ते 17 डिसेंबर 2020 दरम्यान ग्रामीण भागातून 79,506 आणि शहरी भागातून 33,537 लोकांची तपासणी केल्यानंतर हा अहवाल समोर आला आहे.
भारतात मधुमेहाचे 10 कोटी रुग्ण
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) अहवालानुसार, भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या 101 दशलक्ष आहे, जी 2019 मध्ये 70 दशलक्ष होती. अनेक राज्यांमध्ये ही आकडेवारी वेगानं वाढत आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, साडेतेरा कोटी नागरिक हे प्री-डायबेटिक (Prediabetes) आहेत. म्हणजेच, त्यातील एक तृतीयांश लोकांना कधीही मधुमेह होऊ शकतो.
मधुमेह होण्यामागची नेमकी कारण काय?
लठ्ठपणा (Obesity), संथ जीवनशैली (Slow Lifestyle) आणि कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असणं ही डायबेटीसची तीन प्रमुख कारणं आहेत. गोवा (Goa), पुदुच्चेरी (Puducherry) आणि केरळ (Kerala) या राज्यांमध्ये मधुमेहाचं प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दर एका मधुमेह रुग्णामागे 4 प्री-डायबेटिक केसेस आहेत, अशी माहितीही लॅन्सेटमध्ये देण्यात आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian Council of Medical Research) अर्थात ICMRनं ही आकडेवारी ब्रिटनच्या लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे.